मुंबई: राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटला असताना पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे उद्यापासून दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरेंचा दौरा दोन दिवसांचा असेल. त्यात ते काही राजकीय भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
पर्यटन आणि पर्यावरण अशी दोन खाती सांभाळत असलेले आदित्य ठाकरे उद्यापासून २ दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. हा दौरा शासकीय आहे. आदित्य ठाकरे काही परिषदांमध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात राजकीय भेटीगाठी होण्याचीदेखील शक्यता आहे. आदित्य ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेण्याची शक्यता आहे.
राज्यात वातावरण तापलं; शिवसेना वि. भाजप संघर्ष शिगेलाराज्यात सध्या हनुमान चालिसावरून वाद पेटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावी, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिला होता. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. सामाजिक तेढ निर्माण करणारी विधानं केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक झाली. त्यांना पोलीस ठाण्यात भेटायला गेलेले भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. त्यांच्या कारची काच शिवसैनिकांनी फोडली. या प्रकरणी सोमय्यांनी आज सकाळीच केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली.