Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचा आणि शिवसेनेचा दसरा मेळाव्यावरूनही अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विरोधकांकडून शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) टीका करताना अनेकदा पेंग्विनचा उल्लेख केला जातो. मात्र, आदित्य ठाकरेंनी या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देताना पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
बाळासाहेबांच्या विचाराच आम्हीच सोने आम्हीच लुटणार, या टीकेवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मला वाटत खोके सरकारने टीका करणे, हेच आता हास्यास्पद झालेले आहे. वेदांताचा प्रकल्प आपल्या राज्यातून गेला आणि हे त्यांच्या सरकारच्या काळात झाले आहे. सरकार घटनाबाह्य बनले आहे. त्यामुळे हे झाले आहे. देशभरातील शिवसैनिकाची यंदाच्या मेळाव्या बाबत उत्सुकता वाढली आहे, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले.
पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान, आता कोस्टल रोड सेना असेही म्हणा
पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान आहे. मी जेव्हा पेंग्विन मुंबईत आणले. ते पाहण्यास अधिकाधिक लोकं आले होते आणि त्याला किती प्रसिद्धी मिळाली. तुम्ही पेंग्विन सेना बोलत राहा,आम्ही अशी अनेक काम केली आहेत. त्याबद्दलही बोलत राहा.कोस्टल रोड सेना, असेही म्हणू शकता, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. टेंभी नाक्यावर जाऊन देवीचे दर्शन घेणार का, या प्रश्नावर बोलताना, उद्धव ठाकरे असतील मी असेन, आम्ही तिथे वर्षानुवर्ष दर्शनाला गेलेलो आहोत. त्याचप्रमाणे रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्यावर जाऊन दर्शन घेतले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, रामदास कदम यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना, मी त्यांच्यावर कधी बोलतच नाही. माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत.चांगल्या गोष्टीबाबत बोलावे. वेडेवाकडे जे आरोप करतात.त्याच्यावर कधीच बोलू नये, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"