मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरही तयारी सुरू केली आहे. यावर बोलताना, आम्ही कॉर्पोरेट रिस्पॉन्स, मेडिकल रिस्पॉन्स आणि सिविक रिस्पॉन्स, या तीन गोष्टींवर लक्ष दिले आहे, असे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी मुंबईची लाइफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनसंदर्भातही भाष्य केले.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करायला तयार आहे का? राज्यात कशी तयारी सुरू आहे? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, ''अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात आम्ही लोकांकडून फिडबॅकदेखील घेत आहोत. मात्र, आता कोरोना लाट संपली असे कुणीही समजू नये. आपण असाच विचार करायला हवा, की भलेही आंकडे कमी झाले असतील, मात्र, दुसरी लाट संपलेली नाही. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी आपल्याला आणि संपूर्ण जगाला अद्याप आणखी वेळ लागणार आहे.''
याच बरोबर, ''आपण जेव्हा कोरनावर नियंत्रण मिळवत पुढे जातो, तेव्हा अर्थव्यवस्थाही चालायला हवी. लॉकडाउनपासून आम्ही बिगीन अगेनकडे वाटचाल करत आहोत. मात्र, अशात लोकांनी मास्क लवणे, हात स्वच्छ ठेवणे, सोशल डिस्टंन्सिगचे पालन करणे, आवश्यकता नसताना घरातून बाहेर न पडणे, यावरही लक्ष द्यायला हवे. कारण याच गोष्टी आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतात. लसीकरणही सुरू आहे. मात्र, लस घेतल्यानंतरही सुरक्षित राहणे आवश्यक आहे.''
तिसऱ्या लाटेसंदर्भात ठाकरे म्हणाले, ''यासाठी आम्ही कॉर्पोरेट रिस्पॉन्स, मेडिकल रिस्पॉन्स आणि सिविक रिस्पॉन्स, या तीन गोष्टींवर लक्ष दिले आहे. मेडिकल रिस्पॉन्समध्ये आम्ही बेड्सची संख्या वाढवत आहोत. औषधी, लशी आणि आयसीयू वाढवत आहोत. मुलांसाठी पहिल्यांदाच महाराष्ट्रात टास्क फोर्स तयार करण्यात आला. कॉर्पोरेट रिस्पॉन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास त्यांनी बरीच मदत केली आहे. मात्र, आता स्वतःच्या जबाबदारीकडेही पाहावे लागेल. कामाच्या ठिकाणी एखाद्याला कोरोना झाल्यास कसा सामना करावा. सिविक रिस्पॉन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, अनलॉक कसे होईल, दुकानं कशी उघडली जातील. य सर्व गोष्टींवर आम्ही लक्ष देत आहोत.''
याशिवाय, मुंबईत पुन्हा एकदा लोकल ट्रेन्स केव्हा सुरू होतील? असे विचारले असता, "कोरोनाचे आकडे कमी झाल्यानंतर आम्ही असे वागू लागलो, की आता कोरोना संपलाच आहे. मात्र, लोकल ट्रेनसंदर्भात बोलायचे, तर हा निर्णय आम्ही आता घेऊ शकत नाही. प्रत्येक निर्णयापूर्वी, आम्हाला वैद्यकीय तज्ज्ञांचे मत जाणून घ्यावे लागेल. यासंदर्भात जेव्हा मेडिकल टास्क फोर्स सांगेल, तेव्हाच यावर निर्णय घेतला येईल,'' असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.