अनंत जाधवसावंतवाडी : बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या आमदारांविरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या आक्रमकतेला उर्जा देण्याचे काम शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेने सुरू आहे. आदित्य यांच्या या यात्रेला शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यानंतर ही शिवसंवाद यात्रा ३१ जुलैला शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघात येणार आहे. त्यामुळे शिवसैनिक जोरदार कामाला लागले आहेत.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले असून त्यांना शिंदे गटाकडून प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तेव्हापासून ते शिंदे गटाची बाजू प्रखरपणे प्रसारमाध्यमांसमोर मांडत आहेत. त्यातून केसरकर शिवसेनेच्या रडारवर आले आहेत.यातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सावंतवाडी विधानसभा मतदार संघात येत असलेल्या याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही यात्रा ३१ जुलैला निघणार असली तरी अद्याप पर्यंत कोठून, कुठे, कशी जाणार हे निश्चित झाले नाही. मात्र शिवसैनिक जोरदार तयारीला लागले असल्याचे दिसून येत आहे.ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूरकडे त्या दिवशी रवाना होणार आहे. मात्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे सोबत कोण कोण नेते या यात्रेत सहभागी होणार हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. मात्र, ठाकरे सावंतवाडीत येण्याचे निश्चित झाल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
आदित्य ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार, केसरकरांच्या मतदारसंघातून निघणार 'शिवसंवाद यात्रा'
By अनंत खं.जाधव | Published: July 27, 2022 12:20 PM