जळगाव – शिवसेना हा पक्ष दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, जोपर्यंत हे विचार जिवंत आहेत, तोपर्यंत शिवसेना आहे. शिवसेनेला संपवणारा पैदा झालेला नाही अशी घणाघाती टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर केली आहे. जळगावात युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेवर बरीच संकट आली, पण शिवसेना कायम आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो असे ते म्हणाले.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनाप्रमुख गेले कुठे? असं म्हणणारे पागल आहेत. संघटना मरेल, पक्ष मरतील परंतु विचार मरत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ही संघटना सुरू आहे. बाळासाहेबांवरही संकटं आली. बाळासाहेबांच्या जवळची माणसं फुटले. तरीही संघटना कायम आहे. जाणारे गेले. पाणी वाहून गेले. कुणीही म्हटलं शिवसेना संपवू मात्र बापजादे आले तरी कुणीही शिवसेना संपवणारा पैदा झालेला नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना असेच बोर्डावर लिहिलेले असायचं. आम्ही निवडणूक लढवू हे माहिती नव्हतं. आम्ही शिवसेनेत येताना निस्वार्थी आलो, आमदार, खासदार होऊ हे विचारातही नव्हतं. १९८९ साली शिवसेना भाजपा युती झाली. १९९० मध्ये शिवसेनेचे ५२ आमदार आले भाजपाचे ४२ आमदार आले. आपल्या झाडावर वाढलेल्या वेलाने आपल्याला पोखरून टाकलं आहे. युवासैनिकांची गरज आता आपल्याला आहे. प्रत्येक गावात युवा सैनिक हवा आहे असं आवाहन करत गुलाबराव पाटलांनी भाजपालाही टोला लगावला.