ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - शिवसेनेचे उपविभागप्रमुख अनिल चव्हाण यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. मीरा-भाईंदरच्या काशीमीरा पोलिस स्थानकाच्या हद्दीतीस जनतानगरच्या साईकृपा कॉम्प्लेक्समध्ये मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी चव्हाण यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत चव्हाण यांच्या मानेला एक गोळी लागली असून दुसरी मिसफायर झाली आणि आरोपी पळून गेले. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अनिल चव्हाण यांना प्रथम मीरारोडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
याप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र भररस्त्यात हा गोळीबार झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.