मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकराने घेतला आहे. तर याविषयी बोलताना 'ठाकरीबाणा खरा ठरला' असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री व शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.
नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरत विरोधकांनी सरकाराला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अधिवेशनात कर्जमाफी होणार नसल्याचे संकेत सत्ताधारी पक्षाकडून देण्यात येत होते. परंतु अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'सर्जिकल स्ट्राइक' करत शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. त्यांनतर राजकीय वर्तुळातून या विषयी विविध प्रतिक्रिया येत आहे.
तर शिवसेनेने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. शेतकरी चिंतामुक्त आणि कर्जमुक्त होण्यासाठीच 'मातोश्री' सोडून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थेट महाराष्ट्राच्या राजकीय मैदानावर उतरले आहे. त्यामुळे त्यांनी कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे. यालाच ठाकरीबाणा म्हणतात, असे खोतकर म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी गेली पाच वर्षे सातत्याने उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने संघर्ष केला. सत्ता प्राप्तीनंतर सर्वात प्रथम सरसकट कर्जमाफीचा ऐतीहासीक निर्णय घेऊन हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सिध्द करून दाखविले, असल्याचे सुद्धा यावेळी खोतकर म्हणाले.