मुंबई: हनुमान चालीसा आणि त्यानंतर भाजप नेत्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्यांवर झालेल्या दगडफेकीचे समर्थन केले आहे. तसेच, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मंगेशकर कुटुंबाने दिलेल्या पुरस्कारावर टीका केलीये. त्यावर आता भाजपचे उत्तर आले आहे.
'राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता नाचत असतो'भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे राऊत आणि आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या पोस्टमध्ये उपाध्ये म्हणतात की, "रोज सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता माध्यमांसमोर नाचत असतो. भाजपाच्या नावाने शिमगा करायचा, हा एककलमी कार्यक्रम मालकांनी दिला असून, त्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करत असतो. किरीट सोमय्या यांच्यावरील दगडफेकीचे समर्थन करताना जर भविष्यात खरोखरच भ्रष्टाचारी नेत्यांवर कुणी दगडफेक, चप्पला फेकल्या तरी निषेध करू नये म्हणजे झाले, अशी टीका उपाध्येंनी राऊतांवर केली.
'तुमच्या म्होरक्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली का'ते पुढे म्हणतात, "ठाकरे सरकारविरुद्ध बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा ही ऑफर नाही तर तुमच्या दहशतीला चाप बसवण्याचा लगाम आहे. सरकारविरोधात कुणी बोललं, मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले म्हणून राजद्रोहाचा खटला दाखल करणाऱ्यांचा आणखी किती काळ हा सत्तेचा माज राहील सांगता येत नाही. सत्तेसाठी आंधळे झालेले काही महाभाग नेते आता स्वत:च्या स्वार्थासाठी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांवरही आरोप करत आहेत. मंगेशकर कुटुंबीयांनी 12 कोटी जनतेचा अपमान केला म्हणे. अहो, मग नवाब मलिक, अनिल देशमुख, सचिन वाझे या तुमच्या म्होरक्यांनी अभिमानास्पद कामगिरी केलीय का? माध्यमांत चर्चेत राहण्यासाठी भाजपाविरोधात वाटेल ते बोलत राहणं ही सवय मुलुंडपासून मुंब्रापर्यंत नेत्यांना जडलीय," असा घणाघात त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला.