मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसनेच्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोर रिंगणात उतरवले असल्याचे आरोप सेनेच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी केले आहे. तर आता याच मुद्यावरून शिवसनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेत युती असल्याने आम्ही भाजपच्या उमेदवारांसाठी अंग झटकून मेहनत केली. त्यांना निवडणून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला. मात्र त्याच भाजपने विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत आमच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघात भाजपने बंडखोर पेरले. सालेहो सेटींग करता, तेही आमचीच मते खाऊन. सेटींग करायची असती तर मी लोकसभा निवडणुकीत केली असती. असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जहरी टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर उमेदवार होते. त्यावेळी त्यांना मी सांगितले असते तुम्ही लोकसभा लढा, मी विधानसभा लढतो. पण मी युती धर्माचे पालन केले. गद्दारी आमच्या रक्तात नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.