मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेली रेशमी किड्याची उपमा फारच झोंबली आहे. अमृता यांना प्रत्यूत्तर दिल्यानंतर शिवसेनेने थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच पत्र लिहिले असून फडणवीस पती-पत्नीला वेळीच आवरण्याचा इशारा दिला आहे.
फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. शिवसेनेनं यावर अद्याप चुप्पी साधली होती. मात्र, आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांच्या या विधानावरुन फडणवीस यांना लक्ष्य केलं. तसेच, या विधानाबद्दल माफी मागण्याचं आवाहनही केलं होतं. महिला या सर्वात शक्तिशाली असून त्या बांगड्या परिधान करतात. राजकारण हे चालतच राहते, पण ही मानसिकता बदलायला हवी, असे आदित्य यांनी फडणवीसांना उद्देशून म्हटले होते. आता, आदित्य ठाकरेंच्या या ट्विटला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते.
तुमच्या ''रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते, असे म्हणत अमृता यांनी आदित्य ठाकरेंना सर्व आयतं मिळाल्याचं म्हटलंय. तर, देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरून वाद सुरू झाला असून आदित्य ठाकरेंच्या आईचे नाव रश्मी असल्याने अमृता यांनी ही खालच्या स्तरावरील टीका केल्याचा निषेध शिवसेनेने केला.
तसेच शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी थेट संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनाच पत्र लिहून देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांना राजकीय आगपाखड करण्यापासून आवरा असा इशारा दिला आहे. त्यांच्या अशा हस्तक्षेपामुळे हिंदू पक्ष दुरावत आहेत. शिवसेना भाजपा युती तुटण्य़ाला फडणवीसांची अरेरावीच कारण आहे. अतिआत्मविश्वास त्यांना नडला. अमृता फडणवीसांचे ट्वीट अशोभनीय असून पती पत्नीच्या नात्याला, संस्कृतीला धक्का देणारे आहे. अमृता यांना भाजपाच ताब्यात घ्यायचा आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
यावेळी त्यांनी अमित शहा, नितीन गडकरी आणि मोदींच्या पत्नीचा दाखला दिला. त्यांच्या पत्नी अशी वक्तव्ये कधीच करत नाहीत. सीतेने रावणाला शिव्या दिल्याचं कधी ऐकले नाही. अमृता यांच्या वर्तनामुळे २०२४ मध्ये भाजपाला नुकसान होऊ शकतं, असा इशाराही त्यांनी जोशी यांना दिला आहे.