राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त करत गद्दारी खपवून घेतली जाणार नसल्याचं म्हटलं.
“कार्यकारिणीची बैठक संपली आहे. सर्व मुद्दे सर्वांना माहितच आहेत. महत्त्वाचं म्हणजे गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. शिवसेना ही विजयी होणार म्हणजे होणारच. जे पळून गेलेत त्यांच्याविरोधात ही एक सत्य आणि असत्याची लढाई आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सहा ठराव मंजूर
शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आजवर पक्षाच्या प्रगतीसाठी केलेले काम आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेलं उल्लेखनीय काम याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजुर करण्यात आला. या ठरावावर सर्वांना टाळ्या वाजवून आणि उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.
शिवसेना ही बाळासाहेबांची होती, आहे आणि राहील. इतर कुणीही स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरू शकत नाही. तसं केल्यास रितसर तक्रार आणि कारवाई करण्यासाठीची पावलं उचलली जातील असा दुसरा ठराव संमत करण्यात आला.
शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणी पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना देण्यात आला. हा ठराव खासदार संजय राऊत यांनी मांडला
बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रत्येक महानगरपालिकेवर भगवा आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रत्येक महानगरपालिकेवर भगवा फडविण्याच्या निर्धाराचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.