आसामची राजधानी गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या सर्वावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. नगरसेवकांना मार्गदर्शन त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलं. तेव्हा ते बोलत होते.
“बाहेर असलेल्या आमदारांपैकी ५० टक्के आमदार आपल्यासोबत आहेत. काही आमदार आपल्यासोबत आजही उभे आहेत. काही जणांना जेवायला जाऊया असं सांगून गाडीत बसवलं आणि कैदी बनवून पुढे नेलं. जे काही आमदार कैदी म्हणून बसलेत त्यांना आपल्यासोबत पुढे कसं न्यायचं ते पाहू. काही आमदार तिथून फोन करून आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हणत आहेत. इथे आल्याआल्या आम्ही तुमच्यासोबत राहू असं ते सांगत आहेत,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मनाने तिथे आणि शरिरानं इथे अशी लोक नकोत. शिवसेना मानणारी लोकं, ज्यांच्या रक्तात, मनात हृदयात शिवसेना आहे अशी लोक आपल्याला पाहिजेत. ते समाजाचं, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करू शकतात. प्राईज टॅग लावलेली लोकं आपल्याला नको. आपल्याला प्राईजलेस लोक असतात, विकत देणार नाही अशी लोक आपल्याला हवं. काही जणांना आता भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, असंही ते म्हणाले.