आणीबाणीच्या काळात ज्यांनी अमानुष यातना सोसल्या त्यांचे योगदान स्मरणात रहावे, यासाठी मोदी सरकारने 25 जून हा 'संविधान हत्या दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
काय म्हणाले राऊत? -राऊत म्हणाले, "आणीबाणीला 50 वर्षं झाली आहेत. लोक विसरले आहे. देशात आणीबाणी का लावली गेली, कारण या देशात काही लोकांना अराजक निर्माण करायचे होते. रामलिला मैदानावरून आपल्या जवानांना आणि पोलिसांना, सरकारच्या आदेशाचे पान करूना म्हणून भडकावले जात होते. अशा परिस्थितीत अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असते, तर त्यांनीही आणीबाणी लावली असती. हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता." एवढेच नाही, तर नरेद्र मोदी आणि त्यांच्या सरकार यामुळे बहुमत मिळाले नाही. कारण त्यांना संविधान बदलायचे होते," असेही राऊत यावेळी म्हणाले.
काँग्रेसचाही मोदी सरकारवर पलटवार -"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये गेल्या दहा वर्षांपासून अघोषित आणीबाणी लादली होती. गेल्या ४ जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. या निवडणुकांत भारतीय जनतेने पंतप्रधान मोदी यांचा राजकीय व नैतिक स्तरावर पराभव केला. हा दिवस इतिहासात ‘मोदीमुक्ती दिन’ म्हणून नोंदवला जाईल," असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, "आणीबाणीत संविधान पायदळी तुडवल्याने काय काय घडले, याची आठवण २५ जून रोजी पाळण्यात येणारा ‘संविधान हत्या दिन’ नेहमीच जागती ठेवणार आहे," असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटले होते.