मुंबई: काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अनिल परब(Anil Parab) यांच्याबाबतच्या ऑडिओ क्लिपममुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी आज होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात येण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मेळाव्याला येत नसल्याचं सांगितलं आहे.
शिवसेना नेते रामदास कदम दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती ठीक नसल्यामुळे ते दसरा मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय कदम यांनी निर्णय घेतला आहे. मागील तीन महिन्यांपासून रामदास कदम आजारी आहेत. रामदास कदमांवर ब्रीज कँडी रुग्णालयात आणि घरी दोन महिने उपचार सुरू होते. संसर्ग वाढू नये, यासाठी डॉक्टरांनी त्यांना गर्दीत न जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यामुळेच दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कदम यांनी पत्राद्वारे कळवलं आहे.
काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या आवाजाची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात कदम भाजप नेते किरीट सोमय्या यांना परीवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील पुरावे देण्यासंदर्भात एका कार्यकर्त्यांशी बोलत असल्याचं समोर आलं होतं. या कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं. त्यामुळे आज होणाऱ्या दसरा मेळाव्यास शिवसेना नेते रामदास कदम उपस्थित रहाणार की नाही यावर मोठी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू होती. पण आता ते मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.