कल्याण : शिवसेनेची मुलूख मैदान तोफ, महाराष्ट्राचे माजी कामगार मंत्री, शिवसेना नेते, प्रखर शिवभक्त, दुर्गप्रेमी, फर्डे वक्ते साबीरभाई शेख यांचे बुधवारी वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पत्नीचे अलीकडेच निधन झाले होते. त्यानंतर ते त्यांचे पुतणे अल्ताफ शेख यांच्याकडे राहत होते. त्यांचा मधुमेह बळावला होता आणि वेद रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ११ वाजता कोन येथील त्यांच्या निवासस्थानातून निघणार आहे.साबीरभाई हे मूळचे नारायणगावचे. आपले भविष्य घडविण्यासाठी ते मुंबईत आले आणि त्या प्रवासातच ते शिवसेनेच्या संपर्कात आले. तेव्हापासून ते शिवसेनाप्रमुखांचे कट्टर अनुयायी झाले. अखेरच्या श्वासापर्यंत ते शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांशी एकनिष्ठ राहिले. १९९० साली ते सर्वप्रथम अंबरनाथमधून आमदार झाले. १९९५ मध्ये ते पुन्हा निवडून आले आणि मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात कामगारमंत्री झाले. १९९९ मध्ये त्यांनी आमदारकीची हॅटट्रिक नोंदविली. त्यानंतर, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर राहू लागले. नंतर, ते शिवसेनेच्या राजकारण आणि समाजकारणतही दिसेनासे झाले. शिवचरित्राचा सखोल अभ्यास, गड आणि दुर्गांबद्दलची प्रचंड आस्था, त्यावर केलेली भ्रमंती, इतिहासाच्या ज्ञानावर असलेले प्रभुत्व यामुळे त्यांचे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अनोखे मैत्र जुळले होते. दादा कोंडके यांच्याशी त्यांचा घनिष्ठ स्नेह होता. त्यांच्या प्रत्येक प्रचार मोहिमांचा आरंभ दादांच्या उपस्थितीत होत असे. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुखदेखील होते. आनंद दिघे जिल्हाप्रमुख झाल्यावर त्यांना शिवसेना नेतेपदी बढती दिली गेली होती. (प्रतिनिधी)
शिवसेना नेते साबीर शेख यांचे निधन
By admin | Published: October 16, 2014 5:30 AM