मुंबई : मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (mansukh hiren death case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांना झालेली अटक यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपसह अन्य पक्षांनी ठाकरे सरकारला चांगलेच घेरले असून, या प्रकरणी आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची एक प्रतिक्रिया आली आहे. (shiv sena leader sanjay claims over sachin vaze case)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. सचिन वाझे प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाचे थैमान! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे; काँग्रेसचा सल्ला
सचिन वाझेंमुळे अडचणी निर्माण होतील
संजय राऊत म्हणाले की, जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हणालो होतो की, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील. हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
मिठाचा खडा टाकलेला नाही
काही मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार अजिबात नाही. आपण राजकारणात असू, तर टीका सकारात्मकपणे घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे टिकेचे घाव सोसूनच या शिखरावर पोहोचले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याबद्दल चार शब्द लिहिले, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.