राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. फडणवीसांना खरंतर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री असं म्हणणं सोपं आहे. पण मला त्यांना अजूनही उपमुख्यमंत्री म्हणणं कठीण जात आहे. पक्षाचा आदेश पाळण्याची संघाची परंपरा आहे. त्यामुळे फडणवीसांनी आदेशाचं पालन केलं त्याबाबत त्यांचं कौतुक करायला हवं, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
“आपला जो अंतरात्मा असतो तो सांगतो, तू काही केलं नाही, निर्भयपणे चौकशी यंत्रणांना सामोरे गेले पाहिजे. त्याच आत्मविश्वासानं मी गेलो आणि १० तासांनी बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा. प्रयत्न झाले, आम्ही नाही गेलो. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यासोबत राहिलो,” असं राऊत म्हणाले.