मुंबई : भगवा झेंडा लावणे ही महाराष्ट्रीची शान आहे, प्रतिष्ठा आहे. ज्यांच्या नावाने आपण हे राज्य चालवत आहोत त्या छत्रपती शिवरायांचा आज राज्याभिषेकदिन आहे. ज्या दिवसाने आम्हाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची आणि पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, त्याला विरोध करणारे हे नतदृष्टे कोण आहेत? असा सवाल करत, सरकारने अशा घुबडांची काळजी न करता, फिकीर न करता, शिवरायांच्या या भगव्याची प्रतिष्ठा राहील, अशा प्रकारे कठोर कारवाई करावी, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. याच बरोबर, भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असेही राऊत म्हणाले. (Shiv Sena leader Sanjay Raut commented on saffron flag on maharashtra at all government offices and gunwant sadavarte)
तुम्हाला राजकारण करण्यासाठी बाळासाहेबांची गरज लागते; संजय राऊतांना मनसेचं प्रत्युत्तर
गुणरत्न सदावर्ते यांनी, महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवण्याविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, असे म्हटले होते, यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत बोलत होते. राऊत म्हणले, भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयांवर फडकणे, हे आपले स्वप्न आहे, आपला स्वाभिमान आहे. स्वातंत्र्य लढ्यात भगव्याने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना लढण्याची प्रेरणा दिली. तसेच अशा पद्धतीने भगवा फडकावणे हा अजिबात तिरंग्याचा अपमान नाही. कारण भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला.
एक लक्षात घ्या, भगव्याचे तेज होते म्हणून हा देश स्वातंत्र्य लढ्यात लढू शकला. अनेक क्रांतीकार या भगव्या ध्वजाच्या तेजातून निर्माण झाले. त्यांच्या पाठीशी या भगव्या ध्वजाची आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा होती. हे जर कुणाला कळत नसेल, तर अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.