गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यावरून राजकारण रंगू लागलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यास यापूर्वी काँग्रेसनं विरोध केला होता. तर दुसरीकडे नामांतरावरून भाजपाही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान, जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे. "औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे," असं राऊत यांनी आपल्या सदरात म्हटलं आहे. "“महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. माझ्या राज्यात लाचलुचपत म्हणजे भ्रष्टाचार चालणार नाही असे तो बरळत असे, पण स्वतः औरंगजेब हा पैसे घेऊन पदव्या आणि सरदारक्या बहाल करीत असे. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी," असंही राऊत यांनी आपल्या सदरात नमूद केलं आहे.
औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, राऊतांचा काँग्रेसला टोला
By जयदीप दाभोळकर | Published: January 17, 2021 9:19 AM
काँग्रेसनं औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला केला होता विरोध
ठळक मुद्देयापूर्वी काँग्रेसनं नामांतराला केला होता विरोधनामांतरावरून भाजपाचा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न