नाशिक – भाजपा आणि त्यांच्या नव हिंदुत्ववादी MIM यांना कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीनं जागा दाखवली. भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही, लोकं स्वीकारत नाही. भोंगे तुमचे असले तरी त्यामागचा आवाज कुणाचा आहे हे कोल्हापूरच्या उत्तर जनतेने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करून दाखवलं आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपलं आहे. ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर(Raj Thackeray) घणाघाती टीका केली आहे.
खासदार संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भोंगे, हनुमान चालीसा असं राजकारण सुरू केले. मात्र कोल्हापूरच्या जनतेने विरोधकांचे भोंगे खाली उतरवला आहे. समाजात तणाव निर्माण करण्याचं काम कोल्हापूरच्या जनतेने नाकारलं आहे. रामनवमी, हनुमान जयंती दोन्ही सण देशात उत्साहाने साजरा होत आहे. रामनवमीला देशात कधी दंगल घडल्या नव्हत्या. मात्र ज्याठिकाणी निवडणुका आहेत त्याठिकाणी अशाप्रकारे ताणतणाव निर्माण करण्याचं काम करून फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कथाकथित भक्तांनी हनुमान चालीसा कॅमेऱ्यासमोर म्हणावी. मी अख्खी हनुमान चालीसा मी वाचून दाखवतो. आम्ही ढोंगीपणा करत नाही. यांना राष्ट्रगीतही म्हणता येत नाही असं सांगत त्यांनी भाजपावर(BJP) निशाणा साधला आहे.
तसेच हनुमान आमच्या पाठिशी आहे. हे कोल्हापूर उत्तर जनतेने दाखवून दिले. महाराष्ट्रात भाजपा निराशा आणि वैफाल्याने ग्रस्त आहेत. सत्ता येत नाही आमदार फुटत नाही. अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करूनही लोकं शांतता भंग होऊ देत नाहीत. भोंगे यांनी लावायचे आणि नवहिंदु औवेसी आणि खरा औवेसी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली भडकवायचा. त्यानंतर राजभवनातून केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं हे षडयंत्र आहे असाही आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तिन्ही पक्ष एकत्रित काम करत आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडी भक्कम असल्याचं सिद्ध झालं. या देशात इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण आम्ही पाहिलं नाही. राज्यात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना धोका नाही. अयोध्येत शरयू नदी किनाऱ्यावर नाशिक शिवसेनेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचा आमचा संकल्प आहे. अयोध्येला आम्ही पाहुणे म्हणून जात नाही. ते आमचं घर आहे. आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा तेथील मंदिराचे पुजारी, रहिवासी स्वागताला येतात असं सांगत राऊतांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं आहे.