मुंबई : शिवसेना नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. वास्तविक, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राऊत यांना आठ दिवसांची कोठडी सुनावण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, याआधी प्रवीण राऊतप्रकरणी सर्व कागदपत्रे हाती असताना संजय राऊत यांची आठ दिवस कोठडी कशाला? असा प्रश्न करत न्यायालयाने राऊत यांना केवळ चारच दिवसांची ईडी कोठडी सुनावली.
पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. घोटाळ्यातील काही रक्कम संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांनी राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात जमा केल्याचा ईडीने आरोप केला आहे. एप्रिल महिन्यात ईडीने वर्षा राऊत व त्यांच्या दोन सहकाऱ्यांची सव्वाअकरा कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मी आणि शिवसेना तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असे त्यांनी राऊत कुटुंबाला सांगितले. केंद्र सरकार आणि ईडी कारवायांविरोधात शिवसैनिकांनी सोमवारी रस्त्यावर उतरत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले.
ईडीचा दावा : पुराव्यांसोबत छेडछाड राऊत यांना चौकशीसाठी तीनदा समन्स बजावण्यात आले. मात्र, चौकशीसाठी ते एकदाच हजर राहिले, असा आरोप ईडीने संजय राऊत यांच्यावर केला. त्यांनी महत्त्वाच्या पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचेही ईडीने म्हटले. तसेच राऊत तपासात सहकार्य करत नसल्याचेही ईडीने नमूद केले.
राऊतांतर्फे युक्तिवाद : सूडापोटी कारवाई
- ईडीने केलेले सर्व आरोप संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी फेटाळून लावले.
- ईडीने रिमांड अर्जात केलेले सर्व आरोप स्पष्ट नाहीत. त्यांच्यावर राजकीय सूडापोटी कारवाई करण्यात आली आहे.
- आर्थिक गुन्हे शाखेने २०२०मध्ये पत्राचाळ अनियमिततेबद्दल तपास करण्यास सुरुवात केली. मात्र, प्रवीण राऊत यांच्यावर गेल्या वर्षी ईसीआयआर नोंदविण्यात आला आणि जानेवारी २०२२मध्ये त्यांना अटक झाली. संजय राऊत यांना अटक करण्यात आली नव्हती.
- वर्षा राऊत यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार करायचा होता, तर पैसे थेट वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले असते का?
- कायदेशीर मार्गानेच पैसे मिळाले आहेत आणि वर्षा राऊत यांनी केलेला सर्व व्यवहार कायदेशीरच आहे.
घरचे अन्न घेण्याची मुभासंजय राऊत यांना घरचे अन्न व औषधे देण्याची परवानगी दिली. तसेच त्यांना सकाळी ८:३० ते ९:३० पर्यंत वकिलांना भेटण्याची परवानगीही देण्यात आली.
राऊत कुटुंबीय लाभार्थीसंजय राऊत यांना न्यायालयात दुपारी २ वाजून ५४ मिनिटांनी हजर केले. ईडीने राऊत यांना आठ दिवस ईडी कोठडी सुनावण्याची विनंती केली. आर्थिक गैरव्यवहारातून राऊत कुटुंबीयांना १ कोटी सहा लाख रुपयांचा आर्थिक फायदा झाला. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या ५५ लाख रुपयांतून दादरला फ्लॅट खरेदी करण्यात आला आणि काही रकमेतून अलिबाग येथे किहीम बीचजवळ वर्षा राऊत व स्वप्ना पाटकर यांच्या नावे जमीन खरेदी करण्यात आली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रण्ट मॅन’ आहेत. संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांच्या देशाअंतर्गत व परदेशातील दौऱ्यांसाठी पैसे वापरले जात, अशी माहिती ईडीतर्फे ॲड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात दिली.
न्यायालयाचे निरीक्षण राऊत यांना ईडी कोठडी सुनावण्याची आवश्यकता असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ११२ कोटींची अफरातफर केली आहे. त्यानंतर ही रक्कम आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यातील ५५ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करण्यात आला. काही विकासकांना बेकायदा एफएसआय विकण्यात आला. चौकशी व गुन्ह्याचे स्वरूप पाहता ईडी कोठडीची आवश्यकता आहे, असे ठामपणे वाटते, असेही न्यायालयाने म्हटले.