राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, अशा परिस्थिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र युती असताना उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री म्हणून होतं, असं मोठं वक्तव्य केलं.
“एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. हिंदुत्व वगैरे हे संगळं तोंडी आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजपनं रोखलं आहे. जर भाजपनं आश्वासन पाळलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. भाजपमुळेच ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि त्यात भाजपसोबत ते जायला निघालेत ही आश्चर्यकारक गोष्ट आहे,” असं राऊत म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यात त्यांनी यावर संपूर्ण परिस्थितीवर भाष्य केलं.
उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री झाले, ते एका विशिष्ट परिस्थितीत ते मुख्यमंत्री झाले. तीन पक्षांचं सरकार आहे. तिन्ही भिन्न विचारांचे पक्ष आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नावाशिवाय दुसरं नाव दिसलं नाही. तेव्हा आम्ही त्यांना आग्रह केल्याचंही ते म्हणाले. शिवसेना भाजपमध्ये अडीच वर्षांचा जो काही करार होता तो झाला असता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. विधीमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री झाले असते, असंही ते म्हणाले.