नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यात आजही उत्तम संबंध, परंतु... : संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 11:56 PM2021-06-29T23:56:59+5:302021-06-30T00:02:05+5:30
यापूर्वी ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली होती भेट. राज्यातील महत्त्वाच्या चर्चांनंतर मुख्यमंत्री, पंतप्रधानांमध्ये झाली होती वैयक्तीक चर्चा.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी वैयक्तीक चर्चाही केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध उत्तमच आहेत. राजकारण एक निराळी बाब आहे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय राऊत यांच्या जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. यावरून शिवसेना आणि भाजप एकत्र येतील अशा शक्यता वर्तवल्या जाऊ नये. आमचे मार्ग निराळे आहेत. परंतु ठाकरे कुटुंबीय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध उत्तम आहेत. राजकारण हे निराळं आहे. परंतु वैयक्तिक सबंध उत्तम आहेत," असं राऊत म्हणाले. एनडीटीव्हीशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. "शरद पवार यांना पाहा, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आम्ही असे लोक आहोत जे नाती कायम जपतो," असंही त्यांनी नमूद केलं.
निवडणुकांचं वचनबद्ध नव्हतो
"महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे विचार निराळे आहेत. परंतु हे सरकार पाच वर्ष चालेल हे आमचं वचन आहे. कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं. ते ठीक आहे. आम्ही निवडणुका सोबत लढण्यासाठी वचनबद्ध नाही. आम्ही सरकार चालवण्यासाठी वचनबद्ध आहोत. तीन वर्षांनंतर कोण कशाच्या जोरावर निवडणुका लढवणार ते पाहू. सरकार चालतंय आणि चालत राहिल. निवडणुका आल्यानंतर पाहू," असं त्यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना सांगितलं.
मराठा आरक्षणात केंद्रानं हस्तक्षेप करावा
मराठा आरक्षणाबाबत बोलताना राऊत यांनी केंद्रानं या प्रकरणी हस्तक्षेप करावा असं पंतप्रधानांना सांगितल्याचं म्हटलं. "पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे यांनी यावर चर्चा केली आहेत. यात राजकारण कुठे आलं? भाजर सध्या विरोधीपक्षात आहे. परंतु त्या पक्षातील नेत्यांशी आजही आमचे चांगले संबंध आहेत. राजकारण आणि नाती वेगवेगळी आहेत. ठाकरे कुटुंबीय आणि शरद पवार यांचेही कायम उत्तम संबंध होतं. आम्ही नाती जपणारी लोक आहोत," असं राऊत म्हणाले.