१० जून रोजी राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच कोणताही दगाफटका बसू नये यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना अन्यत्र हलवलं आहे. शिवसेनेनंही आपल्या आमदारांना एका हॉटेलवर ठेवलं आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ही एक व्यवस्था म्हणून असं केलं आहे. मतदानाच्या वेळी एकत्र जायचं असतं. महाराष्ट्र मोठा आहे, दऱ्या खोऱ्यांचा आहे, आमदार लांब राहतात. त्यांना काही सूचना द्यायच्या असतात. विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदानाची प्रक्रिया ही तांत्रिक असते. वेगळ्या प्रकारचं मतदान असतं, आमदारांना मार्गदर्शन करायचं असतं, म्हणून त्यांना एकत्र ठेवलं आहे,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
“अशाप्रकारे भाजपनं, काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं आपल्या आमदारांना एकत्र ठेवलंय. त्याबद्दल थोबाडावर प्रश्नचिन्ह निर्माण करावं असं काय आहे,” असा सवालही त्यांनी केला. तुम्ही केलं तर चालतं, तुमचं गेट टुगेटर आणि आम्ही बाजूला घेऊन गेलो, हे सर्व मुर्ख लोक आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. १० तारखेला संध्याकाळी ८ वाजता निकाल स्पष्ट झाले असतील असंही ते म्हणाले.
मनसेला टोला“मनसेनं त्यासंदर्भात त्यांचे भाजपमधील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा. केंद्रात त्यांचं सरकार आहे. राज्याकडून हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे,” असं म्हणत मनसेला टोला लगावला. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतरण कधी होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी मनसेवर निशाणा साधला.
भाजपवर निशाणा“प्रथमच एखाद्या मोठ्या देशाला लहान देशाकडून माफी मागण्याचा आग्रह होतोय. यापूर्वी अशी हिंमत कोणी केली नव्हती. भाजपकडून अशा प्रकारचे विषारी विचार या देशात पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या लोकांवरचं त्यांचं नियंत्रण सुटलं आहे. ते धर्मा धर्मात तेढ निर्माण करून राजकारण करतायत. तो प्रकार भाजपच्या अंगलट आला असला तरी देशाची आज बदनामी झाली आहे,” असं नुपूर शर्मा यांच्या विधानावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले.