भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करून उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती. उर्फी केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, यानंतर उर्फी जावेदनंही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना सवाल केले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्टही शेअर केलीये.
“अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया. पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवाल अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केला आहे.
“जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना (म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीस यांना) मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धीझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल,” असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.