"२५ पक्षांची सभा, तरीही मैदान भरलं नाही: इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 03:22 PM2024-03-18T15:22:08+5:302024-03-18T15:22:49+5:30
कार्यकर्त्यांचे सोडून द्या तर भाषण करणाऱ्या व्यक्तीला तरी त्या भाषणाचा अर्थ समजला का, हा देखील संशोधनाचा विषय आहे अशी खिल्ली सामंतांनी उडवली.
मुंबई - इंडिया आघाडीचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात घेतला असता तरी चालले असते. एवढा खर्च करण्याची आवश्यकता नव्हती. २५ पक्षांनी एकत्र सभा घेऊन सुद्धा मैदान भरू शकत नाही, हा प्रकार नैराश्यपूर्ण व वेळकाढूपणा करणारा असून इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो असा टोला शिवसेना नेते उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे.
उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली. सामंत म्हणाले की, बाळासाहेब जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेची सभा घ्यायचे त्यावेळेस त्यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण मैदान आणि आजूबाजूचा परिसर गर्दीने ओसंडून जायचा. मात्र कालच्या मेळाव्याला एवढी कमी गर्दी होती की, येथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे काय सुरु आहे, अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह होते. यापेक्षा जास्त गर्दी शिवसेनेच्या किंवा महायुतीच्या तालुक्यांच्या सभेमध्ये असते असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे फक्त एकदा नाव उच्चारले. इतर पक्षाच्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या नावाचा उच्चार देखील आपल्या भाषणात केला नाही. अगदी राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेबांचे नाव आपल्या भाषणात घेतले नाही. इंडिया आघाडीच्या नेत्यांचे भाषण सुरु असताना हे भाषण कशासाठी सुरु आहे, त्याचा अर्थ सुद्धा कित्येक कार्यकर्त्यांना उमगत नव्हता. कार्यकर्त्यांचे सोडून द्या तर भाषण करणाऱ्या व्यक्तीला तरी त्या भाषणाचा अर्थ समजला का, हा देखील संशोधनाचा विषय आहे अशी खिल्ली सामंतांनी उडवली.
#WATCH | Mumbai: On INDIA alliance rally that took place yesterday at Shivaji Park, Maharashtra Minister Uday Samant says, " ...In Shivaji Park, there used to be Balasaheb Thackeray's meetings...yesterday there was no crowd in Shivaji Park...it was a function of one… pic.twitter.com/n03tUHmaKI
— ANI (@ANI) March 18, 2024
भाषण ४५ वरून ५ मिनिटात उरकावं लागलं
यापूर्वी शिवसेना अखंड असताना छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये बाळासाहेबांचे भाषण शेवटचे असायचे. त्यांच्या पश्च्यात उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले त्यावेळेस ते ४५ मिनिटे भाषण करायचे. पण कालच्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचना केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना फक्त पाच मिनिटे भाषण करण्याची संधी मिळाली, हे अतिशय दुःखदायक आहे. कुणाला वाटो न वाटो पण आमच्यासाठी ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात उबाठा काँग्रेसमय होऊन नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काम करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे असा खोचक चिमटाही सामंत यांनी उद्धव ठाकरेंना काढला.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हीन दर्जाची टीका करणाऱ्या राहुल गांधींच्या बरोबर स्वतंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ बसून आपण काय साध्य केले याचे उत्तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनतेसमोर द्यावे लागेल. मला काही प्रश्न उद्धव ठाकरे आणि उबाठाच्या नेत्यांना विचारायचे आहेत. कालच्या भाषणाची सुरुवातही तमाम हिंदू बंधू, भगिनींनो आणि मातांनो अशी का झाली नाही. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेले नाहीत? काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर देशात जे वातावरण तयार झाले आहे. त्याचे समर्थन कालच्या मेळाव्यात राहुल गांधींसोबत बसलेले सर्वपक्षीय नेते करणार का? याची उत्तरे मला उबाठा प्रमुखांकडून अपेक्षित आहेत असं उदय सामंत यांनी म्हटलं.