मुंबई - शरद पवारांनी महाराष्ट्रावरील कर्जवाढीवरुन भाजपा सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना, महाराष्ट्र अधोगतीला चालल्याचे पवारांनी म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करताना, पवारांना खडे बोले सुनावले. तसेच, आधीच्या सरकारने जे केले तेच आताचे सरकार करत आहेत. आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते, कर्ज काढून आधीचे सरकार काम करीत होते, असे शिवेसनेनं म्हटलं आहे.
सत्ताधारी पक्षात राहून भाजपावर आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत, पवारांवर टीका केली. राज्यावरील कर्ज आणि गुजरातची दिशा, यावर शिवसेनेनं भाष्य केलंय. महाराष्ट्राला गुजरातच्या दिशेने नेण्याचा प्रश्न. त्याची चिंता पवारांनी करू नये. महाराष्ट्र हा शिवरायांचाच आहे व राहील. मात्र हे सर्व घडत आहे, राज्य अधोगतीला चालले आहे आणि त्यास फडणवीसांचे भाजप शासन जबाबदार आहे असे पवारांना वाटत असेल तर 2014 साली फडणवीस सरकारची पहिली वीट रचणारे पवारच होते व जे झाले ते योग्यच होते, अशी कबुली अजित पवारच देत आहेत, असे शिवसेनेनं म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 मध्ये पाठिंब्याचा चोमडेपणा केला नसता तर राज्याचे चित्र आज वेगळे दिसले असते. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा चोंबडेपणा दिल्लीच्या आदेशानेच झाला. आज, तेच शरद पवार सांगत आहेत की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या आदेशाने राज्य करीत आहेत. महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे, म्हणजे नक्की काय घडले आहे, याचा किरकोळ खुलासा पवारसाहेबांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळातील कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाला, याचा सरळ अर्थ असा की, आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते, कर्ज काढून आधीचे सरकार काम करीत होते व नवे सरकारही कर्ज काढूनच नव्या योजना राबवत राहिल्याचं, सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.