तारक मेहता या मालिकेमध्ये 'आपले गोकुलधाम कुठे आहे, मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी,'असा एक संवाद मालिकेतील बापूजी चंपक लाल यांनी केला आहे. यावरुन मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी मराठीचे 'मारक' मेहता अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यांची मस्ती उतरवावीच लागेल, असा इशाराही अमेय खोपकर यांनी दिला आहे. त्यातच आता अजून एका बॅनरमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यांची मस्ती उतरवावीच लागेल...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ‘मनसे’ दणका
डोंबिवलीत युवा आशापुरा मित्र मंडळातर्फे नमो रमो ट्राफी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या स्पर्धेत गुजराती मारवाडी आणि कच्छी भाषिक खेळाडूंनाच सहभागी होता येणार आहे अशी अट घालण्यात आली आहे. या बॅनरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यात महत्वाची बाब म्हणजे बॅनरवर डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांचा फोटो असल्यामुळे विरोधकांनी देखील भाजपावर टीका केली आहे.
डोंबिवलीत युवा आशापुरा मित्र मंडळातर्फे नमो रमो ट्राफी क्रिकेट स्पर्धेत मराठी भाषिक खेळाडूंना खेळण्यास परवानगी नसल्यामुळे शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. खरे रंग आता समोर येत आहेत असं ट्विट करत भाजपावर त्यांनी टीका केली आहे.
युवा आशापुरा मित्र मंडळाला या स्पर्धेबाबत विचारले असता ही स्पर्धा आमदार रविंद्र चव्हाण यांनी आयोजित केलेली नाही असं सांगितले आहे. तसेच आमच्याच मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले असून यामध्ये आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे संघ खेळणार आहेत. यामध्ये गुजराती, मारवाडी, कच्छी समाजाचे खेळाडूंचा समावेश आहे. मात्र लोकं आमच्या बॅनरचा चुकीचा अर्थ पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा कोणत्याही समाजाला दुखावण्याचा उद्देश नसल्याचे युवा आशापुरा मित्र मंडळाने स्पष्ट केले आहे.