ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेविषयी भाजपा नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्ली दरबारी गेलेले शिवसेना नेते सुभाष देसाई व अनिल देसाई बुधवारी सकाळी मुंबईत परतले आहेत. शिवसेना नेत्यांची भाजपा नेत्यांसोबत पडद्याआड चर्चा झाली असली तरी याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याने संभ्रम कायम आहे.
भाजपासमोर नमते घेत शिवसेना नेते सुभाष देसाई व अनिल देसाई हे दोन नेते मंगळवारी संध्याकाळी दिल्लीसाठी रवाना झाले होते. दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपाचे निरीक्षक राजनाथ सिंह व जे.पी. नड्डा यांची हे दोन्ही नेते भेटही घेणार होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी भाजपाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर हे दोन्ही नेते मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार होते. मंगळवारी रात्री उशीरा भाजपा नेत्यांशी शिवसेना नेत्यांची पडद्याआड चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. नेमकी काय चर्चा झाली, शिवसेना भाजपाला पाठिंबा देणार का याविषयी काहीही समजू शकलेले नाही.
दरम्यान, मुंबईत परतल्यावर सुभाष देसाई व अनिल देसाई हे दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन दिल्लीवारीची माहिती त्यांना देतील. याविषयीची माहिती उद्धव ठाकरेच सर्वांना देतील असे सांगत शिवसेना नेत्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.