मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या महायुतीप्रमाणेच विधानसभेत सुद्धा युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र जागावाटपाच्या मुद्यावरून अंतिम निर्णय होऊ शकला नाही. गेल्यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला भाजपने ८ जागा सोडल्या होत्या. मात्र त्या संपूर्ण ८ ही जागांवर शिवसेनेचे विद्यमान आमदार असल्याने, महायुतीत शिवसेना-भाजपकडून विद्यामान जागा माझ्या पक्षाला सोडण्यात येईल अशी अपेक्षा करतो, असे आठवले म्हणाले आहे.
आठवले यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखीत लोकसभावेळी ठरलेल्या महायुतीच्या फॉर्म्युल्याचा खुलासा केला आहे. भाजप-शिवसेना १३५-१३५ आणि मित्रपक्षाला १८ जागा देण्याचे ठरले होते. अशी माहिती आठवले यांनी दिली आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, गेल्यावेळी माझ्या पक्षाला सोडलेल्या ८ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे आरपीआयला सोबत ठेवायचे असेल तर काही सिटिंग जागा शिवसेना-भाजपकडून मिळायला हव्यात ही अपेक्षा आहे, असं आठवले म्हणाले.
विशेष म्हणजे आठवले यांनी आगामी निवडणुकीत १० जागा आपल्या पक्षाला सोडण्याची मागणी केली आहे. तर या जागा देतांना गेल्यावेळी दिलेल्या जागांचा सुद्धा समावेश असणार आहे. त्यामुळे शिवसेना आठवलेंसाठी आपल्या विद्यमान जागा सोडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर भाजपने सुद्धा काही विद्यमान जागा आमच्यासाठी सोडाव्यात अशी अपेक्षा असल्याचे सुद्धा आठवले म्हणाले.
पुढे बोलताना आठवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्याच पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत. जर आमदार निवडून आले तर ते आमच्या पक्षातील असतील.अन्यथा ते आमदार भाजपचे असल्याचा संदेश जाईल. मात्र आठवले यांना महायुतीत प्रत्यक्षात किती जागा मिळणार आणि जर गेल्यावेळी दिलेल्या जागांचा त्यात समावेश असल्यास सेनेच्या विद्यामान जागा उद्धव ठाकरेंना सोडाव्या लागतील. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यासाठी तयार होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.