मुंबई: भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात नेमकं कोणाला कोणतं खातं मिळणार, याबद्दल मोठी उत्सुकता आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास दोन आठवडे झाले आहेत. त्यामुळे मंत्रिपदांचं वाटप नेमकं केव्हा होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास आघाडीनं चार महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न मार्गी लागल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनंदिलं आहे. मुख्यमंत्रिपद मिळवण्यात यश मिळवल्यानंतर शिवसेना आणखी दोन महत्त्वाची मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरली. गृह आणि नगरविकास खातं शिवसेना स्वत:कडे ठेवणार आहे. तर गृहनिर्माण आणि अर्थ मंत्रालय राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचं समजतं. अद्याप काँग्रेसला कोणतंही मंत्रिपद निश्चित झालेलं नाही. त्यामुळे काँग्रेसला नेमकी कोणती मंत्रिपदं मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नितिन राऊत यांनी मंत्रिपदांची शपथ घेतली. मात्र अद्याप या मंत्र्यांना पदभार देण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास खाती स्वत:कडे ठेवली होती. त्याचप्रमाणे शिवसेनेनंदेखील ही खाती स्वत:कडे घेतली आहेत. फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेही दोन्ही महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रिपद कोणाला देणार, बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांचं काय होणार, याकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे.
चार महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न सुटला; पण काँग्रेसच्या हाती भोपळा?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 7:40 PM