मुंबईः मराठी माणसाला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापनदिन. दरवर्षी या दिवशी राज्यभर शिवसैनिकांचा जल्लोष असतो. यंदा कोरोना संकटामुळे, लॉकडाऊनमुळे वर्धापनदिन सोहळा ऑनलाइन झाला. मात्र, त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये भाषणं केली.
शिवसेनेचा पंतप्रधान करण्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला, तर उद्धव ठाकरेंकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहत असल्याचं विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं. या दोघांनी शिवसैनिकांना दिल्लीचं स्वप्न दाखवलं असतानाच, महाराष्ट्रात शिवसेनेला दोन तृतियांश बहुमत मिळू शकेल, असा आशावाद खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केला.
शिवसेना बलाढ्य तर राज्य बलाढ्य ही संकल्पना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. शिवसैनिकांनी तन-मन-धन अर्पण करून काम केलं तर आगामी काळात महाराष्ट्रात शिवसेनेचे १८० ते २०० आमदार निवडून येतील, असं अनिल देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितलं. राज्यात शिवसेनेची सत्ता आणि खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानं शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वेगळाच जोश पाहायला मिळाला.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं, शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी पाहण्याचे स्वप्न तर पूर्ण झालं. पण, आता आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहोत. आता फक्त राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करायची वेळ आली आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पुढच्या प्रवासाचे संकेत दिले.
स्वतः उद्धव ठाकरे यांनीही सीमोल्लंघनाचा इरादा व्यक्त केला. शिवसेनेनं विचारधारा बदलली नाही आणि शिवसेना कुणापुढे लाचारही होणार नाही. आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढण्यासाठीच मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. 'प्राण जाय पर वचन न जाये' ही आमची संस्कृती आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी मी नात्यात अंतर पडू देणार नाही. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार, असा शब्दच त्यांनी आपल्या शिलेदारांना दिला.
संबंधित बातम्याः
"पंतप्रधानपद लांब राहिलं, आधी मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा करून दाखवा!"
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय - संजय राऊत
शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार; उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनी केला निर्धार
सत्तेत आल्यापासून आम्ही १०० टक्के समाजकारणच केले- आदित्य ठाकरे