उल्हासनगर : शहरातील खाजगी शाळांकडून फी वाढीच्या संदर्भात शिवसेनेने शाळा मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्या सोबत कॅम्प नं-५ येथे बैठक घेतली. बैठकीला आमदार बालाजी किणीकर, महापौर लिलाबाई अशान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
उल्हासनगरातील खाजगी शाळा व्यवस्थापन मनमानी पद्धतीने फी वाढवित असल्याच्या असंख्य तक्रारी शिवसेनेकडे आल्या. विध्यार्थी व पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त करून शिवसेनेला हस्तक्षेप करण्याची मागणी केली. शाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यासोबत मंगळवारी कॅम्प नं-५ मध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकून घेऊन कोरोना काळातील नागरिकांची खरी परिस्थिती समजून दिली. तसेच बैठकीत शाळांची फी वाढ रोखण्यात येऊन, फी न भरल्याने एकाही विध्यार्थ्यांला, तसेच ज्या विध्यार्थ्यांची फी भरण्याची क्षमता नाही अशा विद्यार्थ्यांबाबत माणुसकीच्या भावनेने विचार करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, अशा सूचना शिक्षण संस्था चालकांना दिल्या.