मुंबई : बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपाने भाजपा मंत्र्यांची नाराजी चव्हाट्यावर आली असताना मित्रपक्ष शिवसेनेतही मोठ्या प्रमाणावर धुसफूस आहे. एकीकडे पक्ष म्हणून शिवसेनेच्या वाटेला विशेष म्हणावे असे काही आलेले नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मातोश्री दरम्यान चर्चेची सुत्रे सांभाळणारे सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोन्ही मंत्र्यांच्या खात्यात भर पडल्याने शिवसेनेच्या वर्तुळात नाराजीची भावना आहे.नव्या खातेवाटपात सुभाष देसाई यांच्याकडील उद्योग खात्यासोबतच नव्याने खनिकर्म विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे खाते आधी भाजपा नेते प्रकाश मेहता यांच्याकडे होते. तर, दिवाकर रावते यांच्याकडे परिवहनसोबत खार विकासाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. या दोन्ही मंत्र्यांना अनपेक्षितपणे मिळालेल्या या बढतीचे कोडे मात्र सहकारी शिवसेना नेत्यांना उलघडलेले नाही. शिवसेनेच्या अन्य मंत्र्यांकडे साधारणपणे प्रत्येकी एकाच खात्याचा कारभार असताना देसाई-रावते जोडगोळीकडे दोन दोन खाती झाली आहेत. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मातोश्री दरम्यान झालेल्या चर्चेची सुत्रे याच जोडगोळीकडे होती. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सहभागी होणार की नाही, यावरच बराच खल माजला होता. सन्मानजनक वागणूक न मिळाल्यास मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी व्हायचे नाही, असा पावित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. किमान एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे मिळावीत अशी शिवसेना नेतृत्वाची इच्छा होती. त्यामुळे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही बाजूने चर्चेच्या फे-या झडत होत्या. मातोश्री आणि वर्षा बंगल्यादरम्यान सुरु झालेल्या चर्चेच्या फे-यांची सारी सुत्रे सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्याकडे होती. उशिरापर्यंत चाललेल्या या शिष्टाईचा शिवसेनेला फारसा लाभ झाला नाही. कॅबिनेटची मागणी साफ धुडकावून लावत दोन राज्यमंत्र्यांचा समावेश आणि विद्यमान मंत्र्यांकडे गृह विभागाचे राज्यमंत्री देण्याचे ठरले.त्याप्रमाणे गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केले. यात सुभाष देसाई यांना उद्योगासोबत खनिकर्म तर आणि दिवाकर रावते यांच्याकडे परिवहनसह खार विकास सोपविण्यात आले. कोणतीही चर्चा नसताना अचानक दोन्ही नेत्यांकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आल्याने अन्य शिवसेना मंत्री व नेत्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. पक्षाच्या हाती विशेष काही लागले नसताना चर्चेसाठी, मध्यस्थीसाठी गेलेल्या नेत्यांना खात्यांची बक्षिसी मिळते, ही बाब ठीक नसल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. (प्रतिनिधी)पक्षाच्या हाती विशेष काही लागले नसताना चर्चेसाठी, मध्यस्थीसाठी गेलेल्या नेत्यांना खात्यांची बक्षिसी मिळते, ही बाब ठीक नाही. पक्ष नेतृत्वाने विश्वासाने चर्चेची जबाबदारी सोपविली होती. यातून पक्षासाठी काही सन्मानजनक बाबी घडायला हव्या होत्या. प्रत्यक्षात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्यांनाच लाभ मिळाल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
खातेवाटपावरुन शिवसेना मंत्रीही नाराज
By admin | Published: July 15, 2016 3:37 AM