मुंबई - उद्धव ठाकरे यांना Action Mode वर यायला उशीर झाला. २०१९ ला मविआच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले, पक्षाचे पक्षप्रमुख होते. सत्तेत असताना, मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना वारंवार सांगायचो. आपल्यासोबत सत्तेत असणारे सत्तेचा फायदा घेत लोकांमध्ये फिरतायेत, राज्यभर जातायेत. तुम्हीही फिरायला हवं. लोकांमध्ये जायला हवं असं त्यांना सांगितले. परंतु अडीच वर्षाच्या काळात ते लोकांमध्ये आले नाहीत. पण आता ते जातायेत. त्यांना उशीर झाला अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी मालेगावच्या सभेवरून ठाकरेंना टोला लगावला आहे.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, सभा घेतल्या तर राज्याच्या हिताचं बोलायला हवं. पण सभा पाहिल्या, पत्रकार परिषदा पाहिल्या तर केवळ आमच्या ५० लोकांवर टीका करायची. घालूनपाडून बोलायचे. बाळासाहेब ठाकरे ज्वलंत हिंदुत्वाचा विचार द्यायचे त्यावर उद्धव ठाकरे बोलत नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वारंवार काँग्रेस अपमान करतेय. त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गप्प आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधीच हे सहन केले नसते. केवळ ४०-५० आमदारांच्या मतदारसंघात जायचं आणि टीका करायची हेच करतायेत. १८ तास आत्ताचे मुख्यमंत्री काम करतायेत. ज्यांना आमच्यावर टीका करायची करू द्या, आम्ही आमचे काम करतोय असंही त्यांनी सांगितले.
तसेच बाळासाहेब ठाकरे असते तर उर्दूतील पोस्टर्स लागले असते तर ते चालले असते का? सत्तेसाठी आणि मविआसाठी काय काय सहन करावे लागतेय हे लोकांनी विचार करायला हवा. संजय राऊतांना काय बोलायचे ते बोलू द्या. त्यांच्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेची अशी अवस्था झालीय, ४० आमदार, १३ खासदार बहुतांश जिल्हाप्रमुख हे वेगळे झाले. हिंदुत्वापासून शिवसेनेला बाजूला नेण्याचं काम संजय राऊतांनी केले. उद्धव ठाकरे कधी टोमणे देत नव्हते पण राऊतांची संगत जास्त वाढली तेव्हापासून हे असे बोलायला लागले. तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार, ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा तुमच्याकडे आहे परंतु तुम्ही त्यापासून दूर जात आहात असं मी उद्धव ठाकरेंना सांगितले होते. संजय राऊत कुणासाठी काम करतात हा खरा तर संशोधनाचा विषय आहे अशी टीकाही शंभुराज देसाईंनी ठाकरेंसह संजय राऊतांवर केली आहे.
CAG रिपोर्टमध्ये गंभीर ताशेरे मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील कॅगचा अहवाल सभागृहात मांडला. हा रिपोर्ट सर्वांसाठी खुला झाला आहे. त्याचा अवलोकन आदित्य ठाकरेंनी करावे. १२ हजार कोटींच्या कामात गंभीर अनियमितता झालीय त्याचे ठळक मुद्दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात मांडले. कॅगच्या रिपोर्टमध्ये जे काही आले ते मांडले आहे. जनतेच्या पैशांची अशी अफरातफर झालीय त्याची चौकशी व्हायला हवी. या रिपोर्टवरून SIT नेमा अशी आमची मागणी होती. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे भूमिका मांडतील असं शंभुराज देसाई यांनी सांगितले.
त्याचसोबत कॅगचा अहवाल वाचा आणि त्यात जे आक्षेप असतील त्यावर सभागृहात बोला. आदित्य ठाकरे सभागृहात बोलत नाही. विधेयके मंजूर झाले, अर्थसंकल्प मांडले कशावरही ते बोलले नाहीत. आता कॅगचा अहवाल आहे. त्यावर एक दीड महिना अभ्यास करा आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तरी बोला. माध्यमांपुढे जायचे, चौकशीला सामोरे जायची तयारी त्यांनी करायली हवी असा चिमटाही शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना काढला.