मोसिन शेख
मुंबई - पैठण तालुक्याचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांचा आजचा वाढदिवस चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. पैठण तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने सुरुवातीला त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे निर्णय घेतला होता, परंतु हा निर्णय एका रात्रीत बासनात गुंडाळून विलास भुमरे यांनी धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला.
पैठण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने, गुरुवारी असलेला आपला वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णय विलास भुमरे यांनी घेतला होता. एवढच नाही तर, पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ तसेच कुठल्याही भेट वस्तू आणू नयेत, असे आवाहन त्यांनी केले होते.
दुष्काळ असल्याने वाढदिवस साजरे न करण्याचे निर्णय आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी घेतले आहेत. मात्र वाढदिवस साजरा न करण्याचे निर्णय घेऊन धुमधडाक्यात वाढदिवस साजरे करणारे विलास भुमरे हे पहिलेच नेते असावे.
विलास भुमरे म्हणतात वाढदिवस साजरा न करता गोर-गरीब ३ हजार विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप करण्याचे नियोजन मी केले आहे. तसेच कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचा आवाहन सुद्धा केले होते. परंतु कार्यकर्त्यांचे असलेले प्रेम, त्यामुळे ते शुभेच्छा देण्यासाठी आलेच. जनतेच्या प्रेमापोटी मला ती पुष्पगुच्छ स्वीकारावी लागले आणि वाढदिवस साजरा झाला.