मुंबई: भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणेंवर आहे. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी राणेंवर टोका लगावला आहे.
नारायण राणेंचे दबावतंत्रआमदार वैभव नाईक यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणेंवर टीका केली आहे. 'मतदारांवर दबाव आणण्यासाठी 18 तारखेला महाविकास आघाडीच्या प्रचार प्रमुखावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात फिर्यादीने नितेश राणेंचे नाव घेतले. पोलीस तपासातही नितेश राणे दोषी आढळले, त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. पण, केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत,' असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
नितेश राणे लपून बसलेनाईक पुढे म्हणतात की, 'केंद्रात सत्ता असल्यामुळे नारायण राणेंकडून पोलिसांवर दबाव आणला जातोय. नितेश राणेदेखील बाबा मला वाचव म्हणते पडद्याआड लपून बसले आहेत. सरकारने आणि पोलिसांनी योग्य कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषी असल्यास कारवाई करावी. नारायण राणेंप्रमाणे नितेश राणेंनाही अटक होईल असा आम्हाला विश्वास आहे,' असेही ते यावेळी म्हणाले.
सुडाच्या भावनेतून हा प्रकार सुरू- नारायण राणेनितेश राणेंनी काय केले आहे? काही संबंध नसताना येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारुढ लोकांचा पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हा प्रकार सुरु आहे. गुन्हा दाखल केला आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेले आहे. नितेश राणे अज्ञातवासात नाहीत. अज्ञातवासात जाण्याची आम्हाला गरज नाही. ते आमदार आहेत. आम्ही अटक करणार अशा रितीने बातम्या दिल्या तर कोर्टात जावे लागेल. कोणावरही हल्ला करण्यात नितेश राणेंचे काही योगदान नाही, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.