मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला काहीच दिवस शिल्लक आहेत. अशावेळी भाजपा-शिवसेनेमधला वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपाने आमचा केसाने गळा कापू नये असं विधान करत रामदास कदमांनी भाजपावर आगपाखड केली होती. त्यानंतर आता त्यांचे पुत्र आमदार योगेश कदमही भाजपावर संतापले आहेत.
आमदार योगेश कदम म्हणाले की, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इथं येऊन सभा घेतली त्याचे मला काही वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु सभा घेताना तिथे काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेतले. जे माझ्यासोबत काम करत होते. तर अशा गोष्टी व्हायला नको. जेव्हा आपण एकत्र मिळून काम करतोय, महायुतीत समन्वय ठेऊन पुढे जातोय. अशावेळी जर आमचेच कार्यकर्ते फोडत असले तर मलाही नाईलाजाने तशी पावले उचलावी लागतील असा इशारा त्यांनी दिला.
तसेच भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्यासोबतही मी सविस्तर चर्चा करणार आहे. आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. सभेत काय भाष्य केली, कुणी काय मागण्या केल्या त्यावर मी बोलणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर काहींना उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो. तो काहींनी व्यासपीठावरून बजावला. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. उमेदवारी कोणाला मिळावी आणि न मिळावी यावर बोलू शकत नाही. आज महायुती आहे. सुनील तटकरे विद्यमान खासदार आहेत. शक्यतो, विद्यमान खासदारालाच तिकीट दिले जाते हे आजपर्यंत घडत आलेले आहे. ३० वर्ष याठिकाणी शिवसेनेचे खासदार होते. इथं शिवसेना किंवा राष्ट्रवादी असेच खासदार तिथे आहेत असंही योगेश कदम यांनी सांगितले.
दरम्यान, जर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश भाजपा करून घेत असेल तर ते मला पटलेले नाही. याची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहचवणार आहे. मागच्या वेळी गीतेंचे आम्ही स्वत: काम केले. योगेश कदम नसता तर दापोलीतून गीतेंना लीड मिळाले नसते. गीतेंनी विकास म्हणून काही केले नाही. १५ वर्षात मंत्री असताना एकही उद्योग आला नाही. समाज मंदिर बांधली त्याला विकास म्हणत नाही. जर गीतेंना पुन्हा पराभूत व्हायचे असेल तर त्यांनी लढावे. महायुतीच्या उमेदवाराला दापोलीतून ५५-६० हजारांचे मताधिक्य देऊ असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला.