नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या जातीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांची जात बलई (अनुसूचित जाती) आहे की सुतार (इतर मागासवर्गीय) हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव सरदार यांनी उपस्थित करून अकोला येथील विभागीय जात वैधता पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रलंबित तक्रारीवर चार महिन्यांत निर्णय देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीला दिले आहेत.संजय रायमुलकर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मेहकर मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. २००९ मध्ये साहेबराव सरदार त्यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. सरदार यांच्यानुसार रायमुलकर यांची जात बलई नसून सुतार आहे. कोतवाल पुस्तकात रायमुलकर यांचे आजोबा व पणजोबाची जात सुतार असल्याचे नमूद आहे. रायमुलकर यांची मुले व भावाकडे सुतार जातीचे प्रमाणपत्र आहे. यामुळे त्यांची निवडणूक अवैध आहे. सरदार यांनी २००९ मध्ये रायमुलकर यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अद्यापही निर्णय झालेला नाही. दरम्यान, सरदार यांनी रायमुलकर यांच्याविरुद्ध जात वैधता पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरही निर्णय देण्यास विलंब होत असल्याची बाब लक्षात घेता त्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. तक्रारीवर निश्चित कालावधीत निर्णय देण्याचे समितीला निर्देश द्यावेत अशी त्यांची विनंती होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अशोक भंगाळे यांनी सरदार यांची याचिका निकाली काढली. (प्रतिनिधी)
शिवसेना आमदाराची जात ‘पंचाईत’
By admin | Published: February 13, 2015 1:24 AM