Shiv sena MLA Disqualification Verdict LIVE: विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर उद्धव ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 09:05 AM2024-01-10T09:05:57+5:302024-01-10T19:48:06+5:30

Uddhav Thackeray Vs. Eknath Shinde: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ...

shiv sena mlas disqualification case verdict live updates in marathi uddhav thackeray vs eknath shinde battle in maharashtra | Shiv sena MLA Disqualification Verdict LIVE: विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर उद्धव ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा

Shiv sena MLA Disqualification Verdict LIVE: विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर उद्धव ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा

Uddhav Thackeray Vs. Eknath Shinde: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरू केलं आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. तसेत भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचा निर्णयही  विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. या निकालांनंतर  शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता असून, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना आमदार अपात्रता निकाल Live Updates पाहा...

LIVE

Get Latest Updates

08:48 PM

हा निकाल म्हणजे ह्या ट्रिब्युनलच्या निर्लज्जपणाचा कळस आहे!

हा निकाल म्हणजे ह्या ट्रिब्युनलच्या निर्लज्जपणाचा कळस आहे, अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला. भाजप प्रणित गद्दारांची राजवट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे उघड आहे. लोकशाही संपवण्यासाठी त्यांना राज्यघटना पुन्हा लिहायची आहे. आज ह्या निकालाने आपल्या राज्यातील लोकशाही आणि राज्यघटनेच्या तत्त्वांचा आणि स्तंभांचा अधिकृतपणे खून केला आहे. लोकशाही पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही लढा देऊ! हा निकाल फक्त शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याबद्दल नव्हता. हे आपल्या देशाच्या संविधानाबद्दल आणि लोकशाहीबद्दल आहे! आम्हाला आशा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय ह्या लांच्छनास्पद राजकीय खेळापासून संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करेल, असे आदित्य यांनी म्हटले.

07:47 PM

आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार- उद्धव ठाकरे

शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही. शिवसेना कोणाची हे ठरवेणारे नार्वेकर कोण?. नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. नार्वेकर कोर्टालाही जुमानत नाहीत, हे या निकालावरुन सिद्ध झालं आहे. त्यामुळे, त्यांच्याविरुद्ध अवमानयाचिका दाखल करता येते का, ते आम्ही पाहणार आहोत. तसेच, हा निकाल अंतिम नसून आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 
 

07:31 PM

घराणेशाही मोडीत निघाली - मुख्यमंत्री शिंदे

घराणेशाही मोडीत निघाली. विधानसभा सदस्यांना मनमानीविरुद्द आवाज उठवण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.

07:29 PM

हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र, हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे, असे म्हणत शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 

07:25 PM

ठाकरेंना कोर्टात जावं लागेल - शरद पवार

सत्ताधाऱ्यांनी निकालाबाबत आधीच भाष्य केलं होतं, त्यानुसारच हा निर्णय आला आहे. अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल, असे शरद पवार यांनी म्हटलं. व्हीप बजावण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिलं. तर, व्हीप देण्याबाबात पक्ष संघटना महत्त्वाची, असं कोर्टाने म्हटले होतं. त्यामुळे, येथे सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वे डावलण्यात आली आहेत. आता ठाकरेंना कोर्टात जावं लागेल, असेही शरद पवार यांनी म्हटले. 

06:52 PM

शिवसेना शिंदे गटाप्रमाणेच ठाकरे गटाचेही आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय़

शिवसेना शिंदे गटाप्रमाणेच ठाकरे गटाचेही आमदार पात्र, अपात्र ठरवण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली

06:43 PM

बैठक बोलावताना सुनील प्रभू हे प्रतोद नव्हते, प्रभूंना अधिकारच नसल्याने त्यांनी बोलावलेली बैठक अवैध

बैठक बोलावताना सुनील प्रभू हे प्रतोद नव्हते, प्रभूंना अधिकारच नसल्याने त्यांनी बोलावलेली बैठक अवैध, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला निकाल 

06:36 PM

आम्हाला निकाल मान्य नाही, निकालाविरोधात कोर्टात जाणार, कायदेशीर लढाई लढणार

आम्हाला निकाल मान्य नाही, निकालाविरोधात कोर्टात जाणार, कायदेशीर लढाई लढणार, आदित्य ठाकरे यांनी दिली माहिती

06:31 PM

बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत - विधानसभा अध्यक्ष

बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत,  विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण 

06:17 PM

सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप अवैध

सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप अवैध , विधानसभा अध्यक्षांकडून ठाकरे गटाला मोठा धक्का 

06:15 PM

एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, तसेच भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप हा वैध आहे, असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. 

06:09 PM

प्रतिनिधी सभेच्या पत्रावर केवळ दोन सह्या

प्रतिनिधी सभेच्या पत्रावर केवळ दोन सह्या, त्यामुळे प्रतिनिधी सभा झाली आहे की नाही याबाबत शंका, राहुल नार्वेकर यांचं निरीक्षण

06:07 PM

पक्षात मतभिन्नता व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार - विधानसभा अध्यक्ष

पक्षात मतभिन्नता व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 

05:58 PM

पक्षप्रमुख कुणालाही थेट पक्षातून बाहेर काढू शकत नाहीत - राहुल नार्वेकर

पक्षप्रमुख कुणालाही थेट पक्षातून बाहेर काढू शकत नाहीत, राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करूनच हकालपट्टीचा निर्णय घेता येऊ शकतो. 

05:56 PM

पक्षप्रमुखांचं मत हेच पक्षाचं मत याच्याशी मी सहमत नाही - विधानसभा अध्यक्ष

पक्षप्रमुखांचं मत हेच पक्षाचं मत याच्याशी मी सहमत नाही,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडलं मत

05:52 PM

शिवसेनेतील २०१८ मधील पदरचना घटनेनुसार नव्हती

शिवसेनेतील २०१८ मधील पदरचना घटनेनुसार नव्हती, विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण

05:41 PM

२३ जानेवारी २०१८ रोजी शिवसेनेत निवडणूक झाली नाही

२३ जानेवारी २०१८ रोजी शिवसेनेत निवडणूक झाली नाही,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण

05:30 PM

शिवसेनेच्या घटनेबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान

शिवसेनेची १९९९ मध्ये निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली घटना वैध, २०१८ साली घटनेत केलेले बदल मान्य नाहीत

05:17 PM

निकाल वाचन करताना विधानसभा अध्यक्षांनी कर्मचारी आणि दोन्ही बाजूच्या वकिलांचे मानले आभार

निकाल वाचन करताना विधानसभा अध्यक्षांनी कर्मचारी आणि दोन्ही बाजूच्या वकिलांचे मानले आभार

05:09 PM

विधानसभा अध्यक्ष आणि वकिलांची बैठक संपली, थोड्याच वेळात निकालाचं होणार वाचन

निकालात त्रुटी राहू नये म्हणून विधानसभा  अध्यक्षांनी वकिलांशी केली सल्लामसलत

05:06 PM

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन लांबले, विधानसभा अध्यक्ष अद्याप दालनातच

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन लांबले, विधानसभा अध्यक्ष अद्याप दालनातच, निकाल वाचनासाठी संध्याकाळी ४.३० वाजताची वेळ करण्यात आली होती निश्चित 

04:46 PM

निकाल वाचण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांची ज्येष्ठ वकिलांशी चर्चा

आमदार अपात्रता प्रकरणामध्ये निकाल वाचन करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची वरिष्ठ वकिलांशी चर्चा. थोड्याच वेळात होणार निकाल वाचनाला  सुरुवात

04:37 PM

विधान भवनात पोहोचताच शिंदे गटाच्या भरत गोगावलेंकडून जय श्रीरामच्या घोषणा

विधान भवनात पोहोचताच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. 

04:08 PM

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ४.३० वाजता सुनावणार निकाल

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ४.३० वाजता सुनावणार निकाल,  निकालाकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांसह राज्यातील संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष

03:58 PM

आमचे पुढचे पाऊल जोरदार असेल: तेजस ठाकरे

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अवघ्या काही मिनिटांत येणार आहे. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचे पुढचे पाऊल जोरदार असेल, असे तेजस ठाकरे यांनी म्हटल्याचे समजते.

03:37 PM

आमदार अपात्रता निकालाआधी मोठ्या घडामोडी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्यास काही मिनिटे राहिली आहेत. मात्र, जसजशी वेळ जवळ येत आहे, तसे मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे.

03:18 PM

शिंदे गटाकडून १० व्या परिशिष्टाचे उल्लंघन: सुनील प्रभू

शिंदे गटाने भारतीय संविधानाच्या १० व्या परिशिष्टाचे उल्लंघन केले आहे. निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागेल, असा दावा सुनील प्रभू यांनी केला आहे.

03:11 PM

आम्ही कायदेशीररित्या बरोबर आहोत: शहाजी बापू पाटील

मुख्यमंत्र्यांना आरोपी म्हणणारे बिनडोक आहेत. आम्ही कायदेशीररित्या बरोबर आहेत. निकाल आमच्याबाजूने लागेल. मला कसलेच टेन्शन नाही. शंभर टक्के निकाल ओके लागणार, असे शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे.

02:07 PM

विधानसभा अध्यक्षांकडून दोन्ही गटाच्या वकिलांना मेल

विधानसभा अध्यक्षांकडून दोन्ही गटाच्या वकिलांना मेल पाठवण्यात आला आहे. निकालासाठी उपस्थित राहण्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.

01:40 PM

विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये होणार निकालाचे वाचन

विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये विधानसभा अध्यक्ष निकालाचे वाचन करणार आहेत. ठाकरे गटाकडून एक वकील उपस्थित राहणार आहेत. काही वेळापूर्वी मेल वकिलांना करण्यात आला आहे.
 

01:38 PM

शिवसेनेच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावले

मुंबईत असलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावण्यात आल्याची माहिती आहे. दुपारी ३ वाजता सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाळासाहेब भवन येथे एकत्र जमून सर्व आमदार विधानभवनात जाणार असून, निकालानंतर काय करायचे यावर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

12:38 PM

अध्यक्षांनी मेरिटवर आमच्याबाजूने निकाल दिला पाहिजे: मुख्यमंत्री

आमदार अपात्रता प्रकरणी निकाल आल्यानंतर सविस्तर भाष्य करेन. शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. धनुष्यबाण चिन्ह दिले. शिवसेना अधिकृत पक्ष निवडणूक आयोगाने दिला आहे. बहुमत आमच्याकडे असल्यामुळे आयोगाने आमच्या बाजूने निर्णय दिला होता. आमचे विधानसभेत ६७ टक्के बहुमत आहे. तर लोकसभेत ७५ टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच काही लोक मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. त्यात तथ्य नाही. विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर भरदिवसा भेटायला आले होते. लपूनछपून भेटले नाहीत. राहुल नार्वेकर आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील काही कामे होती. अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याशिवाय, गेल्या दीड वर्षांत आम्ही जी कामे केली, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव दिसू लागला आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

11:59 AM

आमदार अपात्रता निकालाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील: उज्ज्वल निकम

आजच्या निकालाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. लोकशाहीत ज्या कारणासाठी दहावे परिशिष्ट आणण्यात आले, घोडाबाजार-आमदारांची पळवापळवी आणण्यासाठी ते आणलं गेलं. हा उद्देश आज सफल झालाय का? हा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा निकाल देताना विधिमंडळाचा पूर्ण आदर राखला. लोकशाहीत संकेत असतात की आधारस्तंभांनी एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करू नये. या तत्वाचा आदर राखून सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. आजच्या निर्णयातला ऑपरेटिव्ह पार्ट वाचून दाखवला जाईल. पूर्ण निकाल यायला वेळ लागेल. पण आज हे स्पष्ट होईल की कोण जिंकले आणि कोण हरले, असे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. 

11:59 AM

१६ आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल: पृथ्वीराज चव्हाण

आजचा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. जर आज १६ आमदारांना अपात्र केले आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही अशी परिस्थिती समोर आली तर हा एकप्रकारे राजकीय भूकंप ठरेल असे विधान काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. सविस्तर बातमी वाचा...

11:22 AM

हे आमदार अपात्र ठरायला हवेत: ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट

राज्यघटनेत म्हटल्याप्रमाणे दोन तृतीयांश लोक बाहेर जायला हवेत. परंतु, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच बाहेर पडलेल्या या आमदारांचे कुठेही विलीनीकरण झालेले नाही. त्यामुळे हे आमदार अपात्र ठरायला हवेत. परंतु, आता थोडी वाट पाहू, विधानसभा अध्यक्ष चार वाजता काय निर्णय देतात त्याचे विश्लेषण करू, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी दिली.

11:10 AM

पक्षासाठी नाही, तर देशासाठी हा निकाल महत्त्वाचा: आदित्य ठाकरे

आमदार अपात्रतेचा निकाल हा पक्षासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाचा आहे. राहुल नार्वेकर यांनी आपल्या पदाची गरिमा राखावी, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

11:05 AM

कायद्याला धरूनच निकाल दिला जाईल, हे प्रकरण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाणार: संजय शिरसाट

निकाल काहीही लागला, तरी हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी जाणार आहेच. हा निर्णय काहीही लागला, तर त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाणे हे निश्चित आहे. त्यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालात मांडलेले मुद्दे हा त्या सुनावणीचा आधार असणार आहे. त्यामुळे कायद्याला धरूनच निकाल दिला जाईल. सर्वोच्च न्यायालयात निकाल कसा टिकेल, याकडेही नार्वेकरांचे बारीक लक्ष असेल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

11:02 AM

...तर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील: अनिल देशमुख

संकेतांनुसार अध्यक्ष कधी मुख्यमंत्र्यांकडे जात नाहीत. निकाल द्यायच्या आधी तुम्ही तिथे जाता, तर काय त्यांच्याकडून सल्ला घ्यायला गेला होतात का? कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतला, तर १०० टक्के शिंदे गटातले आमदार अपात्र ठरतील, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

10:47 AM

आजचा निकाल मॅच फिक्सिंग: संजय राऊत

राज्यात गेल्या दीड वर्षांपासून घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार आहे. त्यांचे निर्णय सुद्धा घटनाबाह्य आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीसाठी यापूर्वी अनेकदा टाळाटाळ करण्यात आली. कोर्टाने आदेश दिल्यानंतरही त्यांनी रंग दाखवले. आजचा निकाल मॅच फिक्सिंग असल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

10:25 AM

शेड्युल १० च्या दृष्टिने बेंचमार्क ठरेल, असा निकाल लागेल: राहुल नार्वेकर

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दिला जाईल. कायद्याला धरून हा निकाल असेल. कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करून हा निकाल दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत, त्याला अनुसरूनच हा निकाल असेल. सर्वांना न्याय मिळेल. तसेच भारतीय संविधानाच्या शेड्युल १० मध्ये काही संज्ञा अशा होत्या, ज्याचे योग्य पद्धतीने अर्थ लावण्यात आला नव्हता किंवा व्याख्या करण्यात आल्या नव्हत्या. ते या प्रकरणात करणे गरजेचे होते. त्या सर्वांचा विचार या निकालात करण्यात आला आहे. त्यामुळे शेड्युल १० च्या दृष्टीने बेंचमार्क ठरेल, असा हा निकाल असेल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

10:07 AM

आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याबाजूने लागेल अशी अपेक्षाच नाही: अरविंद सावंत

आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याबाजूने लागेल अशी अपेक्षाच नाही. कारण विकाऊ, लाचार लोक बसलेले आहेत. लाचारांकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा बाळगणे, मुर्खपणाचे लक्षण ठरेल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच  अध्यक्ष हे सरड्याप्रमाणे रंग बदलत आहेत. त्यांनी तीनवेळा आपला रंग बदलला आहे. ते काय न्याय देणार? ज्यांनी न्याय द्यायचा, ते आरोपीला जाऊन भेटतात. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लवाद म्हणून नेमले आहे. असे असून तुम्ही आरोपीच्या घरी कसे जाता, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. जर निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

09:59 AM

विजय आमचाच होणार, पराभव होणार हे ठाकरे यांनी मान्य केले: संजय शिरसाट

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल सायंकाळी लागला असून, दोन्ही गटातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे. दोन्ही गटातील नेते यासंदर्भात प्रतिक्रिया देत आहेत. आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. विजय आमचाच होणार, पराभव होणार हे ठाकरे यांनी मान्य केले आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

09:56 AM

शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. माजी क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांचा पुतळा उभारण्याबाबत चर्चा झाली. आमची बाजू सत्याची, आम्ही आमची बाजू मांडली आहे, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी आमदार अपात्रता निकालासंदर्भात दिली.

09:47 AM

शिवसेनेच्या १६ आमदारांना निलंबित केले पाहिजे: पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेच्या १६ आमदारांना निलंबित केले पाहिजे. कायदेशीर अभ्यास केल्यास पक्षांतर झाले, हेच दिसून येते. पक्षांतर झाले नाही, हे दुर्दैवाने सांगितले गेले तर मग पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल आणि ते चक्र पुन्हा सुरू होईल, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच आतापर्यंतच्या अनुभवातून विधानसभा अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचे पाहायला मिळाले नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. 

09:44 AM

ठाकरे गटाच्या वकिलांनी उपस्थित केला वेगळाच प्रश्न

ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे. अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील  वकील म्हणून मला किंवा इतर  वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेली नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार? कदाचित अगदी वेळेआधी कळतील की किती वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जमायचे आहे? पण जर 400 ते 500 पानांचा निर्णय तयार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणे आवश्यक आहेच तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का?? अशी विचारणा सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून केली आहे.

09:37 AM

आमदार अपात्रता प्रकरणासाठी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष भेटले असतील: अब्दुल सत्तार

सरकारचा एक भाग म्हणून भेटले असतील. या प्रकरणात ती भेट नसेल. सरकारचा कामाचा भाग आहे. काही गोष्टी असतात. त्यासाठी भेटले असतील, असे शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
 

09:33 AM

अपात्रतेची टांगती तलवार असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार कोण?

१) अजय चौधरी
२) रवींद्र वायकर
३) राजन साळवी
४) वैभव नाईक
५) नितीन देशमुख
६) सुनिल राऊत
७) सुनिल प्रभू
८) भास्कर जाधव
९) रमेश कोरगावंकर
१०) प्रकाश फातर्फेकर 
११) कैलास पाटिल
१२) संजय पोतनीस
१३) उदयसिंह राजपूत
१४) राहुल पाटील

09:31 AM

अपात्रतेची टांगती तलवार असणारे शिवसेना गटातील आमदार कोण?

१) एकनाथ शिंदे 
२) चिमणराव पाटील
३) अब्दुल सत्तार
४) तानाजी सावंत
५) यामिनी जाधव 
६) संदीपान  भुमरे
७) भरत गोगावले
८) संजय शिरसाठ 
९) लता सोनवणे
१०) प्रकाश सुर्वे
११) बालाजी किणीकर
१२) बालाजी कल्याणकर
१३) अनिल बाबर
१४) संजय रायमूळकर
१५) रमेश बोरनारे
१६) महेश शिंदे

09:30 AM

सरकार टिकले तर मंत्रालयही गुजरातला हलवतील; आदित्य ठाकरेंची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची भेट योग्य नव्हे, ती भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपीने भेटण्यासारखे आहे. येणारा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा आहे. सरकार टिकलं तर मंत्रालयही गुजरातला हलवतील, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

09:25 AM

अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार: देवेंद्र फडणवीस

आम्ही कायदेशीर सरकार तयार केले आहे. अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. महायुतीचे सरकार स्थिर असून सरकार कालही स्थिर होते आणि उद्याही स्थिर राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

09:13 AM

मला खात्री आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागेल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगानेही अधिकृत शिवसेना पक्ष व चिन्ह आम्हाला दिले आहे. मला खात्री आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

09:12 AM

निर्णय कायद्याला धरूनच: राहुल नार्वेकर

आमदार अपात्रता प्रकरणात कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नसून माझा निर्णय कायद्याला धरूनच असणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

09:11 AM

सहा भागांत निकाल, कोणत्या याचिका दाखल

  1. सुनील प्रभू यांनी एकनाथ यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेची केलेली मागणी
  2. सुनील प्रभू यांनी तीन अपक्ष आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
  3. सुनील प्रभू यांनी योगेश कदम यांच्यासह शिंदे गटातील १८ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
  4. सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या व्हिपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदेंसह ३९ आमदारांच्या अपात्रतेची याचिका
  5. सुनील प्रभू यांनी विश्वासदर्शक ठरावाबाबतच्या व्हिपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदेंसह ३९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
  6. व्हिपचे उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेची मागणी करणारी भरत गोगावले यांची याचिका

09:10 AM

३४ याचिकांची सहा गटात विभागणी, त्यानुसार निकालाचे वाचन

३४ याचिकांची सहा गटात विभागणी करण्यात आली असून त्यानुसार निकालाचे वाचन होईल. सायंकाळी चार वाजता विधानसभा अध्यक्ष विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालाचे वाचन करणार आहेत. निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल वाचून दाखवतील. त्यानंतर निकालाची मूळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना दिली जाईल.

09:09 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री तातडीची बैठक

निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री तातडीची बैठक बोलावण्यात आली.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या नव्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या वर्षा निवासस्थानी दाखल झाले. 

09:08 AM

आमदार अपात्रतेचा आज निकाल

ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा; राज्यात राजकीय वातावरण तापले

Web Title: shiv sena mlas disqualification case verdict live updates in marathi uddhav thackeray vs eknath shinde battle in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.