मुंबई : सत्तास्थापनेसाठी भाजपने नकार दिल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत दूसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत काँग्रेस व राष्ट्रवादीकडून पाठींब्याचा पत्र न मिळाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची धाकधूक वाढली असल्याची बोलले जात आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दुसरा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी सोमवारी आमंत्रण दिले होते. त्यामुळे सेनेची सत्ता येणारच अशी अपेक्षा शिवसेना नेते आणि त्यांच्या आमदारांना लागली होती. तर सत्ता आल्यास मंत्रीपद सुद्धा मिळण्याचे स्वप्न काही आमदारांना पडत होते. माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी तर माध्यमांना मला मंत्रीपद मिळणारच असे बोलून सुद्धा दाखवले होते.
राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत काँग्रेस व राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठींब्याचा पत्र न मिळाल्याने सेनेची अडचण वाढली आहे. त्यामुळे आता सेनेला सत्तेत बसायचे असेल तर राष्ट्रवादी पक्षाला पाठींबा द्यावा लागणार आहे. मात्र असे असले तरीही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार किंवा सेनेला राष्ट्रवादी मुख्यमंत्री पद देणार का हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे आता शिवसेना आमदारांची चिंता वाढली असून सत्तास्थापनेचे काय होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी पक्षाला राज्यपाल यांनी आज रात्री 8.30 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीकडून बैठकांवर-बैठका सुरु आहे. मात्र शिवसेनेला सोबत घेतल्या शिवाय त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही. तर शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे आहेत. त्यामुळे सत्ता वाटपाचा या तिन्ही पक्षात ताळमेळ बसला तरच राष्ट्रवादी सत्ता स्थापनाच दावा करू शकणार आहे हे विशेष.