ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मदर तेरेसा यांच्या सेवेमागे धर्मांतरण हा हेतू होता असे विधान करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. मुसलमानांनी तलवारीच्या जोरावर तर ख्रिश्चनांच्या मिशनरींनी पैसा व सेवेचा गूळ लावत धर्मांतर घडवले असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले.
बुधवारी शिवसेनेचे मुखमत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भागवत यांच्या विधानाची पाठराखण केली. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा तुमचा धर्म पूर्ण करत नसेल तर येशूचे सेवक बना, तुम्हाला सर्व काही मिळेल असे आमीष दाखवत मिशनरींनी गोरगरिबांचे धर्मांतर केले असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. स्वखुशीने धर्मांतरण करणा-यांना कोणीही रोखू शकत नाही पण सेवेच्या नावावर धर्मांतरण करणार असाल तर तो सेवा या शब्दाचा अपमान आहे असे त्यांनी म्हटले आहे. मिशनरींकडून सुरु असलेल्या या धर्मांतराविषयीचे परखड सत्य मोहन भागवत यांनी मांडले,यात त्यांचे काय चुकले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मदर तेरेसा यांचे सामाजिक कार्य अतुलनीय आहे. देशात व राज्यातही अशी अनेक मंडळी सामाजिक कार्य करतात.डॉ. अभय बंग, बाबा आमटे अशी अनेक मंडळी राज्यात सामाजिक कार्य करत आहेत, पण त्यांनी सेवेच्या नावाखाली कधी धर्मांतर केले नाही असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.