Maharashtra Politics: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. यातच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवे नाव आणि चिन्ह दिले आहे. यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. यातच शिंदे गटाला मिळालेल्या नावावरून शिवसेनेकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे. शिंदे गटाला जे हवे ते सगळे मिळत जातेय, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव कसे काय मिळाले, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाल्यावरुन शिवसेनेने खिल्ली उडवाताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे. शिंदे गटाला हवे ते सर्व कसे काय मिळतेय आणि त्यांचे अंदाज कसे काय खरे ठरत आहेत? अशी विचारणा शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी केली आहे. लोकशाहीत निवडणूक आयोगाची भूमिका आहे. पक्ष चिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि आम्ही तो स्वीकारला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणूक आयोगाने या प्रतिक्रियांची दखल घेणे गरजेचे आहे, अशी अनिल देसाई म्हणाले.
मोठ्या आणि स्वायत्त संस्थेकडून अशी अपेक्षा नाही
शिंदे गटाकडून गेल्या काही दिवसांत सतत वक्तव्य केली जात आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे. आता त्यांनी म्हटलं होते, नेमके तसेच घडत आहे. त्यांना जे हवे होते, तेच त्यांना मिळाले. शिंदे गटाकडून मांडण्यात येणार विचार आणि निवडणूक आयोगाकडून घेतले जाणारे निर्णय हे एकसारखेच आहेत. मोठ्या आणि स्वायत्त संस्थेकडून अशी अपेक्षा नाही, असे म्हणत अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत आपली नाराजी बोलून दाखवली.
दरम्यान, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी शिवसेनेने सर्व प्रथम निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आणि आता शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले गेले आहे. यावर आमचा आक्षेप आहे. लवकरच पुढील कारवाईसाठी पावले उचलली जातील, असेही अनिल देसाई यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"