Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या शिंदे-भाजप सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. यावरून शिंदे गटाच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतानाच शिवसेनेने भाजपच्याही वर्मावर बोट ठेवले आहे.
शिंदे गट आणि भाजपकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले. यावरून शिवसेनेच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून चांगलेच सुनावले आहे. यावेळी भाजपवरही निशाणा साधला. हे सरकारच बेकायदेशीर आहे. हे देवेंद्र फडणवीसांना कळतेय की हे सगळे बेकायदेशीर आहे. पण अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण भाजपा देशात रुजवतेय. ते स्वत:चीच कबर खोदत आहेत, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरींचे किती खच्चीकरण केले गेले
नितीन गडकरींचे किती खच्चीकरण केले गेले. त्यांचे पाय कापून टाकले. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की या सरकारमध्ये सामील होणार नाही. दोन मिनिटांत दिल्लीवरून आदेश आला शपथ घ्या. घेतली त्यांनी शपथ. मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केले. सगळी खाती अंगाशी घेऊन याने कारभार होणार नाही, असे सांगत महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला पळवले. जे अलिबाबाचे ४० मित्र तिकडे गेले, त्यांना विचारायला हवं की त्यांना याची जनाची नाही, मनाची तरी लाज आहे का? असा संतप्त सवाल सावंत यांनी केला.
आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नाही तर उद्याचे देशाचे नेतृत्व
आदित्य ठाकरे हे उद्याचे महाराष्ट्राचे नेतृत्व आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं याचा अर्थ आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला ते घाबरतात. त्यांना कळून चुकलेय की, उद्याचे देशाचेही नेतृत्व कदाचित ते होतील. मग त्यांना बदनाम करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. एक दूरदृष्टी असणारा तरुण मुलगा एका वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र आणि मुंबईचे नेतृत्व करत होता. दावोसमध्ये ज्याची मुलाखत घेण्यासाठी जगातील सगळे चॅनल धावले, त्या आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही. जे कुणी हे करत आहेत, त्यांची प्रतिमा मात्र नक्कीच कळेल की कोण कुणावर भुंकतेय, असे सांगत विरोधकांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
दरम्यान, त्यांची अब्रू केव्हाच गेली आहे. लोकांच्या सगळे लक्षात आले आहे. अनेक व्हिडिओ क्लिप आहेत की ज्यात ते म्हणत आहेत की आम्हाला अमुक पैसे मिळाले वगैरे. त्यामुळे अब्रू केव्हाच गेली. जो बूंद से गई, हौद से नही आएगी. कितीही पायऱ्यांवर उभे राहा. ते आणखी पायऱ्यांवरून खाली जात जाणार, वर नाही जाणार, अशी बोचरी टीका अरविंद सावंतांनी केली.