ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयासमोर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख सतिश हरडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी ढोल बडविला. कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची यादी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शासनाने शेतक-यांची कर्जमाफी केली. मात्र याची अंमलबजावणी योग्य त-हेने होत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना बँकांच्या शाखेमध्ये जाऊन प्रत्येक शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. त्यासाठी कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची यादी बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये त्वरित प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून किती शेतकºयांनी कर्ज घेतले व किती जण कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसतात त्याची यादीदेखील देण्यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी मागणी केली. कृपाल तुमाने, सतीश हरडे यांच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजू हरणे, संदीप इटकेलवार, राजेंद्र हरणे प्रामुख्याने उपस्थित होते.