मुंबई: सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. आम्ही ऐकत नाही म्हणून कुटुंबीयांना, नातेवाईकांना त्रास दिला जात आहे. मात्र आम्ही झुकणार नाही, गुडघे टेकणार नाही. तुम्हाला जे काय बघायचं आहे ते बघून घ्या, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलं.
राजकारणाची एक मर्यादा असते. मात्र भाजपनं ती ओलांडली. माझ्या मुलीचं लग्न झालं. हॉलवाल्याचं बिल किती, डेकोरेशनचं बिल किती याची विचारणा झाली. त्यांची चौकशी केली. इतकंच काय मेहंदी काढायला आलेल्या, नेलपेंट लावायला आलेल्यांचीदेखील चौकशी झाली. हे काय चाललंय, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
राज्यात भाजपचं सरकार असताना पाच वर्षात एक दूधवाला ७ हजार कोटींचा मालक झाल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केला. 'हरयाणात एक दूधवाला आहे. एस. नरवर त्याचं नाव. या नरवरला ईडी ओळखते का असा माझा प्रश्न आहे. पाच वर्षांत नरवर ७ हजार कोटींचा मालक झाला. भाजप सरकार असताना त्याचं महाराष्ट्रा येणं जाणं असायचं,' असं राऊत यांनी सांगितलं.
हरयाणाचा दूधवाला भाजप नेत्यांना भेटायचा. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्याची उठबस असायची. भाजपचं सरकार असताना त्याची संपत्ती वाढली. हा पैसा कोणाचा आहे? कोणी केलं मनी लॉण्ड्रिंग? त्या ७ हजार कोटींमधले साडे तीन हजार कोटी महाराष्ट्रातून गेले आहेत. त्या नरवरला काही प्रकल्प देण्यात आले. त्यात जो भ्रष्टाचार झाला. त्यातला हा पैसा आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. यामध्ये राज्य भाजपच्या नेत्यांचा सहभाग असल्याचंही ते म्हणाले.