मुंबई - महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणून शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ ट्विट केला. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. सत्ताधाऱ्यांनी या व्हिडिओवरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यावरून आता संजय राऊतांनी यू-टर्न घेत मराठा मोर्चा आमचा नव्हता का? तो व्हिडिओ ट्विट करताना मी मविआचा मोर्चा आहे कुठे म्हटलं? असा प्रतिसवालच पत्रकारांना केला.
संजय राऊत म्हणाले की, माझे ट्विट पाहा, मी कुठेही दावा केला नाही हा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. मराठा मोर्चालाही हे नॅनो मोर्चा म्हणत होते. त्याच रस्त्यावर मराठा समाजाने प्रचंड मोर्चा काढला होता. मी तो महाविकास आघाडीचा मोर्चा म्हटलं नव्हतं. मविआच्या मोर्च्याचे इतर व्हिडिओ मी टाकले आहेत. दोन्ही मोर्चे न्याय हक्कांसाठी होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निघालेले होते. मराठा मोर्चात जे सहभागी होते तेसुद्धा महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यात भाजपाला इतकं कळवळून टीका करण्याचं कारण नाही असा टोला राऊतांनी लगावला.
त्याचसोबत मराठा मोर्चा निघाला, मविआचा मोर्चाही अतिविराट निघाला. असे राजकीय मोर्चे निघाले तर त्याला नॅनो मोर्चा म्हणायचं ही भाजपाची प्रथा आहे. माझा व्हिडिओ पाहा मी मविआ मोर्चा आहे म्हटलं नाही. जर मी म्हणालो असतो मविआचा मोर्चा आहे तर टीकेला वाव होता. मराठा मोर्चाही आमचाच होता. त्या मोर्च्यानेही महाराष्ट्राची शक्ती दिल्लीला दाखवली आणि मविआ मोर्चानेही ही शक्ती दिल्लीला दाखवली असा दावा संजय राऊतांनी केला.
दरम्यान, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे मोर्चे निघाले तर त्यावर टीका करतात. मोर्चाला न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानावर बोलावं. छत्रपती संभाजीराजे प्रगल्भ नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर बोलावं. ते भाजपाच्या नादी कुठे लागलेत. सगळे मोर्चे आपलेच आहे. शिवाजी महाराजांचा अपमानाविरोधात एकत्रित आहोत. भाजपा काही संघटना पकडून आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोपही संजय राऊत यांनी केला.