नाशिक - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि सरकारने कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यायला पाहिजे. या महाराष्ट्रावर असं आक्रमण गेल्या ५०-५५ वर्षात झालं नव्हतं. बाजूचा राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला डिवचतोय, सरळ सरळ आव्हान देतोय. चुल्लू भर पाणी मे डुब जाओ म्हणतं तसे कर्नाटकनं जत तालुक्यात सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्या असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, जर तुम्हाला स्वाभिमान असेल. ज्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली म्हणता मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर, सरकारवर थुंकतोय. ३ महिन्यापूर्वी क्रांती केली म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता क्रांती करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. तुमच्या क्रांतीची वांती झाली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्य आहे की नाही. जनतेचे प्रश्न समजून घ्या, जत, अक्कलकोट याठिकाणी उठाव २-३ महिन्यापासून चाललंय. या महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्री केवळ ४० आमदारांपुरता आहे. महाराष्ट्रात सरकार नाही त्यामुळे इतर राज्याचं आक्रमण होत आहे असं सांगत संजय राऊतांनी शिंदेंवर टीका केली.
छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान, गुजरातच्या सभेत मल्लिकार्जुन खरगेंनी मोदी १०० तोंडाचे रावण आहेत का? असं म्हटलं. त्यावर मोदींनी अश्रू ढाळले. हा गुजरातचा अपमान आहे. गुजरातच्या सुपुत्राचा अपमान आहे असं सांगितले. त्यावर निवडणुका लढवल्या जात आहेत. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान केला जातोय मग तुम्ही गप्प का? आम्ही जे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतोय. रावण म्हटल्यावर गुजरातचा अपमान होतो मग छत्रपतींवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान होत नाही. हा फरक भाजपाच्या विचारांचा आहे असं राऊतांनी म्हटलं.
"शिंदे गटात काय सुरूय याची माझ्याकडे पक्की खबर, वेळ आली की...", संजय राऊत यांचं मोठं विधान!
मेरा बाप गद्दार है...मी खोकेवाला खासदार नाही. दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर गोंदले होते मेरा बाप चोर है, तसं जे आमदार, खासदार सोडून गेले त्यांच्या कपाळावर मी गद्दार आहे असा शिक्का बसलेला आहे. त्यामुळे यांचे नातेवाईक, पोरं यांच्या बायका उद्या लोकं म्हणतात हे गद्दार आहेत. पिढ्यान पिढ्या यांची गद्दारी यांना शांत बसू देणार नाही असं सांगत संजय राऊतांनी शिंदे गटावर बोचरी टीका केलीय.
पुढील साडे ३ महिन्यात सरकार पडू शकतं३ महिन्यापासून क्रांती घडली हे कितीवेळा सांगणार? पुढच्या साडे ३ महिन्यात ते पडू शकते. राजकारण हे चंचल आहे. लोकशाहीत बहुमत त्यापेक्षा चंचल आहे. ज्याप्रकारे तुम्ही राजकीय डाव खेळताय त्यात कुणीही कुणाचं नसतं याचा प्रत्यय तुम्हाला लवकरच येईल. मी खात्रीने सांगतो. मी बोलतोय त्यात तथ्य आहे असा दावा संजय राऊतांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"