नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईत सभा घेणार असल्याचं समोर आले आहे. शिवसेना भवनासमोर ही सभा होईल असं बोललं जात आहे. मात्र त्यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपा पुरस्कृत आहेत असाही टोला राऊतांनी राज यांना लगावला आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं की, शिवसेना भवनाविषयी सगळ्यांनाच प्रेम आहे. सगळ्यांचा आत्मा तिथे अडकला आहे. सभा घ्यायची असेल तर घेऊ द्या. सभा घ्यायला कुणाला बंदी आहे का? आम्ही रोज शिवतीर्थावर त्यांच्या घरासमोर सभा घेतो. सभेला महापालिकेने परवानगी दिली तर घेऊ द्या. आणि सरकार त्यांचे आहे म्हटल्यावर परवानगी देणारच आहे. तेसुद्धा भाजपा पुरस्कृत आहेत असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत सभा घेण्यासाठी परवानगी आम्हाला मिळत नाही. आम्हाला संघर्ष करावा लागतो. कारण आमची भीती आहे. ज्यांची भीती सत्ताधाऱ्यांना नसते त्यांना कुठेही लघुशंका करण्याची परवानगी मिळते अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
नारायण राणे डरपोक, त्याला घाबरण्याचं कारण नाहीतुम्ही तुमचे काम करा. ज्या पक्षात गेला तिथे ईमान राखा. आमच्यावर घाणेरडे आरोप करणे हे तुमचे काम नाही. पण बाडगा असतो तो जास्त मोठ्याने बांग देतो. तुम्ही आमच्याविरोधात उभे राहिले तेव्हाही आम्ही संयम राखला. उद्धवजींनी सांगितले संयम बाळगा. तुम्ही आता मर्यादा सोडलेत त्यामुळे आम्हाला हात जोडलेले आता सोडावे लागलेत. अजून हात सुटलेले नाहीत. तुम्ही आमची काय उखाडणार? तू लाचार माणूस, डरपोक. १० पक्ष बदलतो. डरपोकांना घाबरण्याचं कारण आम्हाला नाही अशा शब्दात संजय राऊतांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला.
त्याचसोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सगळे तुरुंगात जाणार आहेत. अनेकांची प्रकरणे बाहेर आलीत. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा खासदार होणार नाही. डिपॉझिट जप्त होईल. त्याला शिंदे गट असो वा भाजपा कुणीही उमेदवारी दिली नाही. जे लोक आम्हाला सोडून गेलेत ते यापुढे लोकसभेत, विधानसभेत किंवा महापालिकेतही दिसणार नाहीत हे लिहून घ्या असंही राऊतांनी म्हटलं.