मुंबई: मला माजी मंत्री म्हणू नका. पुढील दोन-तीन दिवसांत कळेल, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं. त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जातात. पाटील यांच्या विधानाबद्दल भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. तुम्ही पुढील २५ वर्षे माजी मंत्रीच राहणार आहात, असं मी फोन करून चंद्रकांत पाटलांना सांगितलं आहे, असं राऊत म्हणाले. ते चेंबूरमध्ये शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
आज चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी पुण्यात होते. त्या कार्यक्रमात पाटलांचा उल्लेख माजी मंत्री असा करण्यात आला. त्यावर मला माजी मंत्री म्हणू नका. पुढील दोन-तीन दिवसांत कळेलच, असं सूचक विधान पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. त्यावर भाष्य करताना राऊतांनी टोला लगावला. 'मी स्वत: चंद्रकांत पाटलांना फोन करून २५ वर्षे तुम्ही माजी मंत्रीच असाल असं सांगितलंय,' असं राऊत म्हणाले.राहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय?; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...
संजय राऊत-राहुल गांधींमध्ये काय संवाद झाला?दिल्लीत झालेल्या भेटीवेळी राहुल यांनी मला एका वाक्यात शिवसेना म्हणजे काय, असं विचारलं. त्यावर फटे लेकीन हटे नहीं, हे शिवसेनेचं धोरण असल्याचं मी राहुल यांना सांगितलं, असं राऊत म्हणाले. 'काही दिवसांपूर्वी माझी आणि राहुल गांधींची दिल्लीत भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला शिवसेनेच्या रचनेविषयी, कार्यपद्धतीबद्दल विचारलं. त्यावर आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो की विचार करत नाही. फटे लेकीन हटे नहीं असं असतं आमचं. आम्ही कोणाच्या पाठीत वार करत नाही, असं मी राहुल गांधींनी सांगितलं,' असं राऊत म्हणाले.